Join us

आर्थिक विवंचनेत अडकलेल्या बेस्टला मिनी बसचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 00:47 IST

बसभाड्यात कपात केल्यानंतर तूट वाढल्याने बेस्ट उपक्रम आर्थिक विवंचनेत आहे.

मुंबई : बसभाड्यात कपात केल्यानंतर तूट वाढल्याने बेस्ट उपक्रम आर्थिक विवंचनेत आहे. मात्र भाडेतत्त्वावर घेतलेल्या मिनीबसनी मोठा दिलासा दिला आहे. या बसगाड्या दररोज प्रवाशांनी खचाखच भरून जात आहेत. यामुळे प्रवासी संख्या आता ३४ लाखांवर पोहोचली आहे. म्हणजेच भाडे कपात केल्यानंतर प्रवासी संख्या १४ लाखांनी वाढली आहे.सन २०१४-१५मध्ये बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून सरासरी ३४ लाख प्रवासी प्रवास करीत असत. मात्र जून २०१९पर्यंत ही संख्या सरासरी १७ लाखांवर आली होती. ७ जुलैपासून बेस्ट उपक्रमाने प्रवासी भाडे किमान पाच ते कमाल २० रुपये केले. यामुळे प्रवासी संख्येत वाढ होऊन महिन्याभरात ११ लाखांची वाढ झाली. मात्र बसगाड्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. बेस्ट उपक्रमाने बसचा ताफा येत्या वर्षभरात दहा हजारांवर नेण्याचा निर्धार केला आहे. वातानुकूलित मिनी, मिडी, इलेक्ट्रिक, हायब्रीड बस गाड्यांची फौज वाढविण्यात येणार आहे. काही मिनी बसगाड्यांची सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी कार्यालयात जाण्यासाठी घरातून निघणाऱ्या प्रवाशांची या मिनी सेवेला पसंती मिळत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे.>भाडेतत्त्वावर दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या १६६ वातानुकूलित मिनीबस गाड्या कमी अंतराच्या मार्गावर चालविण्यात येत आहेत. तर, इलेक्ट्रिक आणि मिडीबस गाड्या जास्त अंतराच्या प्रवासासाठी वापरल्या जात आहेत. अंधेरी पश्चिम मार्गावर धावणाºया ६३ वातानुकूलित बसगाड्या गर्दीच्या वेळेत खचाखच भरलेल्या असतात. गेल्या दोन दिवसांत २१ वातानुकूलित मिनी बसगाड्या कुलाबा बस आगारापासून चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सोडण्यात येत आहेत. तर २५ वातानुकूलित बसगाड्या वडाळा बस आगारातून चालविण्यात येत आहेत. सहा महिन्यांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात ३२०० बसगाड्या होत्या. त्यात आता वाढ झाली आहे. प्रवासी संख्या जून २०१९ पर्यंत दररोज सरासरी १७ लाख. प्रवासी भाड्यात कपात केल्यानंतर २७ लाख झाली आणि मिनीबसचा ताफा आल्याने प्रवासी संख्या दररोज सरासरी ३४ लाखांवर पोहोचली आहे.