Join us

एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 05:42 IST

बेस्ट उपक्रमाकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली.

मुंबई : मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) बेस्ट बस तिकिटाच्या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. परंतु इतिवृत्तावर अजून सही झाली नसल्याने अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बुधवारी  झालेल्या एमएमआरटीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

बेस्ट उपक्रमाकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी एमएमआरटीएकडे पाठवला होता. प्रस्तावानुसार ‘बेस्ट’चे साध्या बसचे पाच कि.मी. अंतराचे तिकीट शुल्क पाचवरून दहा रुपये आणि एसी बसचे भाडे सहावरून १२ रुपये होणार आहे; परंतु अद्याप अधिकृत घोषणा झाली नसल्याने ही वाढ कधी लागू होणार याबाबत अनिश्चितता आहे.

मीटर रिकॅलिब्रेशन एक महिन्याची मुदतवाढ

बेस्ट भाडेवाढीसोबतच रिक्षा आणि टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. हे मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती.

सध्या मुंबई महानगर प्रदेशातील ६३ टक्केच रिक्षा आणि टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. दिलेल्या मुदतीनंतर रिकॅलिब्रेशन केले नाही तर दंड आकारण्यात येणार असल्याने याला संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यानुसार बुधवारच्या बैठकीत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.