Join us

बेस्ट कर्मचाऱ्यांचे आज आझाद मैदानावर धरणे, मंत्रालयावर मोर्चा काढण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 08:10 IST

BEST employees : महापालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी व कमी व्याजात कर्ज देऊन आधार दिला आहे. मात्र पालक संस्था असल्याने महापालिका अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे.

मुंबई : बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्याची तयारी केली होती. मात्र, राणीबाग ते मंत्रालय दरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चाला राज्य शासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आझाद मैदानातच धरणे देऊन शिष्टमंडळ आपले निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे. महापालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी व कमी व्याजात कर्ज देऊन आधार दिला आहे. मात्र पालक संस्था असल्याने महापालिका अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप कृती समितीकडून करण्यात आला आहे. ७ ऑगस्ट २०१७ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आश्वासनही दिले होते. परंतु त्यानंतरही मागणी मान्य झाली नाही. याच मागण्यांसाठी मंगळवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ‘बेस्ट’ कर्मचारी संघटनांनी दिला होता. मात्र, राज्य सरकारने मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे बुधवारी दुपारी ३ वाजता आझाद मैदानात कर्मचारी जमा होणार आहेत. त्यानंतर शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत. 

बेस्ट कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवातबेस्ट उपक्रमातील ३४ हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. चालक, वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत बेस्ट उपक्रमातील दोन हजार ८०५ अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त  झाले आहेत. तर ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून यामध्ये बहुतांश कर्मचारी परिवहन व विद्युत विभागातील आहेत. सुमारे १५ कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बेस्टमध्ये कोरोना मुक्तीचे प्रमाण ९६ टक्के पेक्षा अधिक आहे.

टॅग्स :बेस्ट