Join us  

प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात; मुंबईकरांना बसणार फटका?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 5:11 AM

कामगारांत असंतोष : २७ जानेवारी रोजी लाँग मार्च

मुंबई : महापालिकेच्या आर्थिक मदतीनंतरही बेस्ट उपक्रमावरील आर्थिक संकट कायम आहे. बेस्ट कामगारांच्या अनेक मागण्याही रखडल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी बेस्ट कामगार संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली २७ जानेवारी रोजी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. या आंदोलनात बसचालक व वाहक सहभागी होणार असल्याने बेस्टच्या सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बेस्ट उपक्रम गेल्या दशकापासून तुटीत असल्याने हा सार्वजनिक उपक्रम बंद होण्याची वेळ आली आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत अनुदान आणि कर्जाच्या स्वरूपात सुमारे २१०० कोटी रुपये दिले आहेत. मात्र त्यानंतरही बेस्ट उपक्रमाने सुमारे दोन हजार कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प महापालिकेकडे सादर केला. गेल्या वर्षी बेस्ट कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बंद पुकारला होता. परंतु, या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, अशी नाराजी कामगार संघटना व्यक्त करीत आहेत.बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेत विलीन करावा, विनावाहक बस सेवा बंद करावी, स्वत:च्या बसगाड्या विकत घ्याव्या, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी चुकती करावी, ठेकेदार व बिल्डरांच्या घशात बेस्ट उपक्रमाची मालमत्ता घालू नये, अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यानुसार २७ जानेवारी रोजी कोतवाल गार्डन ते वडाळा बस आगार असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. त्यानंतर वडाळा बस आगारामध्ये कर्मचाऱ्यांची सभा घेण्यात येणार आहे.

 

टॅग्स :बेस्ट