‘बेस्ट’चा बडतर्फ वाहक पुन्हा नोकरीत
By Admin | Updated: February 22, 2015 01:41 IST2015-02-22T01:41:42+5:302015-02-22T01:41:42+5:30
होरीलाल श्रीराम जयस्वार या बस वाहकास मागच्या पूर्ण पगारासह पुन्हा कामावर घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने ‘बेस्ट’ प्रशासनास दिला आहे.

‘बेस्ट’चा बडतर्फ वाहक पुन्हा नोकरीत
मुंबई : जात पडताळणी समितीने जातीचा दाखला रद्द केला या कारणावरून नोकरीतून काढून टाकलेल्या होरीलाल श्रीराम जयस्वार या बस वाहकास मागच्या पूर्ण पगारासह पुन्हा कामावर घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने ‘बेस्ट’ प्रशासनास दिला आहे.
मुळात जयस्वार राखीव जागेवर नोकरीस लागले नव्हते. १६ वर्षांच्या सेवाकाळात अनेक प्रशस्तीपत्रे आणि बक्षिसे मिळविल्यानंतर पर्यवेक्षक पदावर बढती देण्याची वेळ आली तेव्हा ‘बेस्ट’ने त्यांचा जातीचा दाखला पडताळणीसाठी समितीकडे पाठविला.
जयस्वार यांनी ‘चमार’ जातीचा दाखला दिला होता. दक्षता पथकाने पाठविलेले पत्र वेळेवर मिळाले नाही म्हणून हजर न राहिल्याने जात पटवून देण्यात जयस्वार यांना स्वारस्य नाही, असा अहवाल पथकाने दिला. त्यावरून जयस्वार ‘चमार’ या राखीव प्रवर्गातील असले तरी त्यांच्या कुटुंबाचे १९५० पूर्वीपासून मुंबईत वास्तव्य असल्याचे पुरावे त्यांनी दिले नाहीत, असे नमूद करत पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरविला. त्याआधारे ‘बेस्ट’ने जयस्वार यांना २६ डिसेंबर २०१३ रोजी नोकरीतून काढून टाकले.
जयस्वार यांनी केलेली रिट याचिका मंजूर करत न्या. विद्यासगर कानडे व न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी पडताळणी समितीचा व ‘बेस्ट’चा निर्णय रद्द केला. ‘बेस्ट’ने त्यांना बडतर्फीपासूनचा पूर्ण पगार देऊन पुन्हा कामावर घ्यावे आणि समितीने जातीच्या दाखल्याची नव्याने पडताळणी करावी, असा आदेश न्यायालयाने दिला.
न्यायालय म्हणते की, जात पडताळणी समितीने केवळ कागदोपत्री पुरावे न पाहता तोंडी पुरावेही विचारात घ्यायला हवेत. या सुनावणीत जयस्वार यांच्यासाठी अॅड. श्रीमती एन. व्ही. सांगलीकर यांनी, ‘बेस्ट’साठी अॅड. आर. एल. सिंग यांनी तर सरकारी वकील एस.जे. सालुजा यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)
च्आपले वडील १९५७ पासून
कापड गिरणीत नोकरी करीत होते व तेव्हापासून आपले कुटुंब मुंबईतच राहते, असे जयस्वार यांचे म्हणणे आहे. दक्षता पथक इतरांच्या साक्ष नोंदवूनही याची खात्री करून घेऊ शकते.
च्धनुकावाडी, कांदिवली (प.) येथील ज्या चाळीत राहतो तेथे चाळीतील सर्वांसाठी एकच टपाल पेटी आहे. त्यामुळे समितीच्या दक्षता पथकाने आधी पाठविलेले पत्र वेळेत मिळाले नाही, हे जयस्वार यांचे स्पष्टिकरणही पटण्यासारखे आहे.