प्रवासी वाढविण्यासाठी बेस्टचे अभियान
By Admin | Updated: November 19, 2015 04:02 IST2015-11-19T04:02:07+5:302015-11-19T04:02:07+5:30
बससेवेचा स्तर सुधारण्यासाठी आणि प्रवासी उत्पन्नात वाढ करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ‘प्रवाशांशी थेट भेट’ हे प्रवासी संपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार

प्रवासी वाढविण्यासाठी बेस्टचे अभियान
मुंबई : बससेवेचा स्तर सुधारण्यासाठी आणि प्रवासी उत्पन्नात वाढ करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ‘प्रवाशांशी थेट भेट’ हे प्रवासी संपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या रविवारी पश्चिम उपनगर विभागातील आगारांचे व्यवस्थापक व अधिकारी प्रवाशांशी थेट संपर्क साधणार आहेत. या भेटीतून अधिकारी प्रवाशांच्या अडचणी आणि सूचनांची नोंद घेणार आहेत.
तोट्यात चाललेल्या बेस्टला चांगले दिवस आणण्यासाठी बेस्ट उपक्रमाने विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवाशांच्या मनात बेस्टबद्दल विश्वास निर्माण करणे आणि प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी बेस्टने प्रवाशांशी थेट भेट अभियान सुरू केले आहे. २२ नोव्हेंबर रोजी पश्चिम उपनगर विभागातील सांताक्रूझ, गोरेगाव, ओशिवरा, मालाड, मालवणी, पोयसर आणि गोराई या आगारांमध्ये आगार व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी सकाळी ११ वाजता प्रवाशांशी संवाद साधणार आहेत. यावेळी प्रवाशांच्या बससेवेसंबंधी अडचणी आणि सूचनांची दखल घेण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होऊन सूचना आणि अडचणी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन बेस्टने केले आहे. (प्रतिनिधी)