चावडी वाचन ठरले लाभदायी
By Admin | Updated: August 15, 2014 02:00 IST2014-08-15T02:00:40+5:302014-08-15T02:00:40+5:30
राजस्व अभियानांतर्गत राज्यात विविध अशा १९ योजना अमलात आणल्या आहेत.

चावडी वाचन ठरले लाभदायी
जयंत धुळप, अलिबाग
राजस्व अभियानांतर्गत राज्यात विविध अशा १९ योजना अमलात आणल्या आहेत. २०१२ - १३ या वर्षात दहा महिन्यात जनसामान्य ग्रामस्थ-नागरिकांच्या अतिउपयुक्ततेच्या विविध प्रकारचे तब्बल ७७ लाख २६ हजार २८८ सरकारी दाखल्यांचे वितरण राज्यात करता आले आणि त्याची नोंद ‘लिम्का बुक आॅफ नॅशनल रेकॉर्ड्स’ मध्ये झाली. याच राजस्व अभियानातील ‘चावडी वाचन’ या उपक्रमाच्या रायगड जिल्ह्यातील गेल्या दहा महिन्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर जिल्ह्यातील १९७० गावांतील ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा आनंद गवसला.
चावडी वाचन या उपक्रमात गावाचे अधिकार अभिलेख तपासून अद्ययावत करणे हा प्रमुख हेतू आहे. यावेळी गावांतील ग्रामस्थाच्या मृत खातेदार नोंदी, वारस नोंदी, अज्ञान पालनकर्ता नोंदी, एकत्र कुटुंब पध्दत नोंदी, सातबारा व इतर हक्क नोंदी, सोसायट्या वा बँक बोज्याच्या नोंदी, कूळकायदा कलम ३२ ग आणि म च्या नोंदी, तगाई कर्ज माफी नोंद, सातबारा उताऱ्यांत झालेली बेकायदा घुसखोरी, सरकारी वा खाजगी जमिनींवरील अतिक्रमणे, शर्त भंग नोंदी, देवस्थान इनाम जमीन नोंदी, वतन जमीन नोंदी, स्मशानभूमी-दफनभूमी नोंदी, अनधिकृत बिगरशेती नोंदी, ७-१२ आणि ८अ उताऱ्यांच्या मागणीची पूर्तता अशा किमान २२ प्रकारच्या नोंदी आपोआपच झाल्याने, अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी अनेक खेटे घालूनही ज्या नोंदी करुन मिळत नव्हत्या त्या त्यांना त्यांच्या गावातच चावडी वाचन उपक्रमात करुन मिळाल्या आहेत.
जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतील १९७० गावांत हा चावडी वाचनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. जिल्ह्यात एकूण ७६ हजार ७३१ नोंदी त्रुटीयुक्त निष्पन्न झाल्या. त्यातील २३ हजार ७३७ नोंदींची तत्काळ तपासणी करुन त्या रीतसर करुन त्यांचे दाखले संबंधित ग्रामस्थांना चावडी वाचनाच्यावेळी देण्यात आले. उर्वरित ५२ हजार ९९४ नोंदींची तपासणी त्या रीतसर करण्याची प्रक्रिया सध्या जिल्ह्यातील १५ तहसीलदार कार्यालयांमध्ये सुरू आहे. कूळकायदा कलम ३२ ग अनुसार करण्यात आलेल्या २५ हजार ८८३ नोंदींमध्ये अनियमितता निष्पन्न झाली. त्यातील ७ हजार २७० नोंदी तत्काळ तर उर्वरित १८ हजार ६१३ नोंदींची तपासणी करण्यात येत आहे.