Join us
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहन असूनही मोफत धान्याचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:08 IST

शिधापत्रिकाधारक मिशन सुधार उपक्रमाद्वारे अपात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना मिळणारा लाभ बंद करण्यात येतो.

खलील गिरकर

मुंबई : शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक कार्यालयांतर्गत असलेल्या सांताक्रुझ येथील ‘ड’ परिमंडळ व कांदिवली येथील ‘ग’ परिमंडळातील शिधापत्रिकाधारक विविध कारणांमुळे अपात्र ठरविले आहेत. ‘आरटीओ’कडून चारचाकी वाहनांची पडताळणी करून १,११३ लाभार्थी शिधापत्रिका अपात्र ठरविल्या आहेत. त्यामध्ये सांताक्रुझमधील ८२१, तर कांदिवलीतील २९२ शिधापत्रिकाधारकांचा यामध्ये समावेश आहे. 

शिधापत्रिकाधारक मिशन सुधार उपक्रमाद्वारे अपात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना मिळणारा लाभ बंद करण्यात येतो. घरात चारचाकी वाहन असतानाही व निकषांत बसत नसतानाही सरकारच्या मोफत धान्य वाटप योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा लाभ बंद करण्याची कारवाई सुरू आहे. यामुळे अपात्र लाभार्थ्यांना होणारे धान्य वाटप बंद होऊन पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळण्यासाठी मदत होणार आहे.

कांदिवली, सांताक्रुझमध्ये कारवाई कांदिवली ‘ग’ परिमंडळात एकूण दोन लाख ५९ हजार ८५६ लाभार्थी आहेत. चारचाकी वाहन असलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या ३६२ आहेत. तर, सायलंट रेशन कार्डधारकांची संख्या सहा हजार ४४३ असून, त्यांना बिनालाभार्थी गटात वर्ग केले. 

सांताक्रुझ ‘ड’ परिमंडळात एकूण लाभार्थी दोन लाख आठ हजार ८३५ लाभार्थी आहेत. चारचाकी वाहन असलेले शिधापत्रिकाधारक एक हजार १४९ आहेत. तर, सायलंट रेशन कार्ड सहा हजार ५७ आहेत, त्यांची तपासणी केल्यावर चार हजार ७४८ जणांना लाभार्थी गटातून बिनालाभार्थी गटात वर्ग करण्यात आले. 

काही वेळा चारचाकी वाहन मालक, आयकरदाते, सरकारी कर्मचारी, एक लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेले रेशन कार्डधारक शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून येते. अशा अपात्र शिधापत्रिकाधारकांना शोधून त्यांना लाभार्थी गटातून हटवण्यात येण्याची कार्यवाही सुरू आहे. मिशन सुधार अंतर्गत ही तपासणी, पडताळणी सातत्याने सुरू आहे. भास्कर तायडे, उपनियंत्रक शिधावाटप, ‘ड’ परिमंडळ, सांताक्रुझ