पालिका शाळेतील मुलांना मिळणार दर्जेदार भोजन
By Admin | Updated: June 15, 2016 01:51 IST2016-06-15T01:51:00+5:302016-06-15T01:51:00+5:30
ठाणे महापालिका शाळेतील मुलांना माध्यान्ह भोजन म्हणून खिचडी पुरवली जाते. अनेक वर्षे हे कंत्राट १९३ महिला बचत गट आणि महिला मंडळे करत आहेत. मात्र बंगळूरच्या अक्षय्य पात्र संस्थेला

पालिका शाळेतील मुलांना मिळणार दर्जेदार भोजन
- नामदेव पाषाणकर, घोडबंदर
ठाणे महापालिका शाळेतील मुलांना माध्यान्ह भोजन म्हणून खिचडी पुरवली जाते. अनेक वर्षे हे कंत्राट १९३ महिला बचत गट आणि महिला मंडळे करत आहेत. मात्र बंगळूरच्या अक्षय्य पात्र संस्थेला या भोजनाचे कंत्राट दिले जाणार असून त्यामुळे स्वच्छ, गरमागरम, चांगल्या दर्जाचे आणि उत्तम पोषणमूल्य असलेले अन्न पालिका शाळेतील पाच हजार मुलांना मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुलांना पुरवल्या जाणाऱ्या भोजनाबाबत निकष ठरवून दिले आहेत. मात्र अनेक शाळांत ते पाळले जात नाहीत. अन्न बनवले जाणारे ठिकाण स्वच्छ नसते. त्यात पोषणमूल्यांचा अभाव असतो. दर्जा चांगला नसतो. अन्नात किडे सापडण्यापासून आमटी पातळ असणे, भाज्यांचा पुरेसा समावेश नसणे, थंड अन्न मिळणे असे अनेक मुद्दे सतत उपस्थित होतात. अन्नाचे कंत्राट, त्यातील टक्केवारी, विशिष्ट बचतगटांना झुकते माप देणे असे अनेक गैरप्रकार सतत चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे १० राज्यांतील ११ हजार शाळांतील १४ लाख विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवण्याचा अनुभव असलेल्या अक्षय्य पात्र संस्थेला कंत्राट देण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. ही संस्था मनपा हद्दीतील पाच हजार विद्यार्थ्यांना भोजन पुरवणार आहे. संस्थेने स्वयंपाकघरासाठी वापरात नसलेल्या इमारतीची मागणी केली आहे. तेथे वीज आणि पाणीपुरवठा पालिकेला उपलब्ध करून द्यावा लागेल. सध्या पवारनगर येथील शाळा क्र मांक १३३ ची दोन वर्षापासून बंद असलेली इमारत संस्थेला देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे.
बचतगटांचा विरोध?
अक्षय्य पात्र फाउंडेशनला भोजनाचे कंत्राट दिले, तर मुलांना गरम आणि सकस भोजन मिळेल. पालिकेचे पैसेही वाचतील. पण त्यामुळे भोजनाच्या कंत्राटातील पळवाटा बंद होणार असल्याने बचतगटांतील असंख्य महिलांचा रोजगार जाण्याची भीती व्यक्त करून या योजनेला विरोध होण्याची शक्यता आहे. मात्र सकस भोजन पुरवणाऱ्या संस्थेचा अनुभव लक्षात घेता आणि हे भोजन मोफत पुरविले जाणार असल्याने हा प्रस्ताव मंजूर होण्याचीच दाट शक्यता आहे.