मुंबई - वरळी बीडीडी चाळीतून टॉवरमधील फ्लॅटमध्ये गेलेल्या ढीका आणि लवंगारे कुटुंबीयांच्या घरी बुधवारी गणपती बाप्पा विराजमान झाले. बीडीडी चाळीतील क्र. ३१ च्या इमारतीतील या दोन्ही कुटुंबीयांकडे काही जुन्या रहिवाशांनीही भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत देवानंद ढीका यांना नव्या घराची चावी मिळाल्यानंतर बीडीडी चाळीतील दुसऱ्या मजल्यावरून, पुनर्वसित 'डी' विंगच्या ४० व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ढीका कुटुंब आठ दिवसांपूर्वी राहायला आले. 'गणपती बाप्पा घरी बसवायचा म्हणून आम्ही लवकर ताबा घेतला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मखराचे काम सुरू होते. मूर्ती रात्रीच आणली. पहाटे ५ वाजता पूजेची तयारी केली, कारण गुरुजींना इतर अनेक पूजा होत्या. त्यामुळे त्यांच्या सोयीनुसार सकाळी ६ वाजता बाप्पाची प्रतिष्ठापना पूजा केली,' असे ४० वर्षीय सतीश ढीका यांनी सांगितले.
आमची मनापासून इच्छा होती, नव्या घरात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याची आणि ती पूर्ण झाली याचे समाधान आहे, अशी भावना ६२ वर्षीय देवानंद ढीका यांनी व्यक्त केली. याच इमारतीतील २७ व्या मजल्यावरील गणेश लवंगारे कुटुंबाच्या घरी बाप्पा सकाळी विराजमान झाले.