धाेक्याची घंटा, महिन्याभरात काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:07 IST2021-03-28T04:07:03+5:302021-03-28T04:07:03+5:30
राज्यातील आकडेवारी; सक्रिय रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मागील काही दिवसांत काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण दुप्पट ...

धाेक्याची घंटा, महिन्याभरात काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण दुप्पट
राज्यातील आकडेवारी; सक्रिय रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांत काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण दुप्पट झाल्याचे चित्र आहे. राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येनेही दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ही धाेक्याची घंटा असून आता यंत्रणांसमोर संसर्ग नियंत्रणाचे आव्हान आहे. मागील महिन्यात राज्यात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे दिसून आले होते, मात्र दुसऱ्या लाटेदरम्यान पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे.
राज्यात १४ मार्च रोजी १ लाख ७ हजार ५३६ कोरोना चाचण्या पार पडल्या, त्यात १६ हजार ६२० रुग्णांची नोंद झाली होती. त्यावेळी दैनंदिन पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १५.४६ टक्के असल्याचे दिसून आले. यात नंतर वाढ होऊन १५ मार्च रोजी ९१ हजार ८७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यात १५ हजार ५१ रुग्णांची नोंद होऊन पॉझिटिव्हिटी प्रमाणात एक टक्क्याने वाढ झाली. या दिवशी पॉझिटिव्हिटी दर १६.३८ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यानंतर, प्रत्येक दिवशी पॉझिटिव्हिटीचे प्रमाण दोन ते तीन टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. १८ मार्च रोजी हे प्रमाण २१.४७ टक्के होते. त्यानंतर २१ मार्च रोजी २२.२५ टक्के हाेते. २२ मार्च रोजी २३.४१ टक्के, तर २३ मार्च रोजी २३.६३ टक्के पॉझिटिव्हिटी प्रमाण असल्याची नोंद आहे.
* अशी झाली उपचाराधीन रुग्णांमध्ये वाढ
राज्यात १ मार्च रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ७७ हजार ६१८ इतकी होती. यात आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून २६ मार्च रोजी राज्यात २ लाख ८२ हजार ४५१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मागील काही दिवसांत संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी दैनंदिन चाचण्यांच्या क्षमतेत वाढ करून दिवसाला १ लाख २० हजारांच्या घरात चाचण्या करण्यात येत आहेत.
......................