Join us

बेलासिस, सायन उड्डाणपूल नवीन वर्षात वाहतुकीसाठी होणार खुले; पालिका, वाहतूक पोलिस, रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 11:17 IST

विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

मुंबई : शहरात सुरू असलेल्या विविध पुलांच्या कामांमुळे मुंबईकरांना वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका आणि रेल्वेवर नागरिकांकडून टीका होत आहे. त्यामुळे महापालिका आणि रेल्वे यांनी संयुक्तपणे हाती घेतलेल्या पुलांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार सायन उड्डाणपुलाचे बांधकाम ३१ मे २०२६ पर्यंत, तर बेलासिस उड्डाणपुलाचे बांधकाम ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?

सायन, बेलासिस, विद्याविहार आणि महालक्ष्मी येथील ‘केबल स्टेड पूल’ या  पुलांच्या  पुनर्बांधणीच्या कामांचा आढावा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)  अभिजित बांगर व पोलिस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी मंगळवारी घेतला. पालिकेत झालेल्या बैठकीस पालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, रेल्वेचे अधिकारी, अभियंते उपस्थित होते. सर्व प्रकल्प मुदतीत पूर्ण होण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घ्यावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले.   

पादचारी पूल उभारल्यावरच पाडकाम

सायन उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचे रेल्वेकडून सुरू असलेले काम ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, त्यास विलंब झाला आहे.

आता पादचारी पुलाचे काम ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची हमी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पादचारी पूल उभारल्यानंतरच पुलाचे पाडकाम पूर्ण केले जाईल.

महालक्ष्मीची कोंडी फुटणार

महालक्ष्मी  येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी दोन नवीन पूल बांधण्यात येत आहेत.

केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा केबल स्टेड पूल’ हा रेल्वे रुळांवरील महापालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे.  पुलाची कामे ३० नोव्हेंबर  २०२६ पर्यंत पूर्ण व्हायला हवीत, असेही  निर्देश बांगर यांनी दिले.

विद्याविहार येथील प्रकल्पबाधितांना पर्यायी घरे

विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

पश्चिम बाजूकडील प्रकल्पबाधितांना  पर्यायी सदनिका देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पाच महिने लागणार आहेत.