हृदयविकार असणाऱ्यांनो सावधान!
By Admin | Updated: December 22, 2015 00:44 IST2015-12-22T00:44:06+5:302015-12-22T00:44:06+5:30
थंडी पडल्यामुळे मुंबईकर काही प्रमाणात सुखावले आहेत. थंडी हळूहळू वाढत असताना हृदयविकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्या,

हृदयविकार असणाऱ्यांनो सावधान!
मुंबई : थंडी पडल्यामुळे मुंबईकर काही प्रमाणात सुखावले आहेत. थंडी हळूहळू वाढत असताना हृदयविकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. थंडी वाढल्याने श्वसनासंबंधीचे आजारही वाढत असल्याने थंडी एन्जॉय करताना पुरेशी काळजी घ्यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
थंडीच्या दिवसांत हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात. तापमानात घट होत असल्याने हृदयाला वेदना होण्याचे प्रमाणात वाढू शकते. कमी तापमानाचा अशा व्यक्तींवर विपरित परिणाम होत असतो. या काळात व्यायाम जास्त केल्यास रुग्णांचा त्रास अधिक वाढू शकतो. हे टाळण्यासाठी हृदयाचा त्रास असलेल्यांनी छातीचा भाग गरम राहील, याची काळजी घ्यावी. पुरेसे गरम कपडे घालावेत, असे केईएम रुग्णालयाच्या कार्डिएक विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, तापमानात घट झाल्यामुळे हृदय आणि घशाचा त्रास वाढतो. त्यामुळे अनेकजण घाबरून जातात. पण, घाबरुन न जाता, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. थंडीत श्वसनासंबंधीच्या आजारात वाढ होण्याचे कारण म्हणजे वातावरणातील घनता वाढल्यामुळे धुलिकण जमिनीवरच राहतात. हवेच्या वरच्या थरात धुलिकण न गेल्यामुळे त्याचा अधिक त्रास होतो. सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींना सर्दी, खोकला होणे, घसादुखीचा त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्यांना अनेक वर्षांची सवय आहे, त्यांना त्रास कमी होतो. पण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना जास्त त्रास होत असल्याचे फिजिशियन डॉ. प्रदीप शहा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)