Join us  

नव वर्षाची नव्यानं सुरुवात, घेऊन साईबाबा अन् बाप्पांचा आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 8:16 AM

एकीकडे पार्ट्या करुन निवांत झोपलेले दिसतात, तर दुसरीकडे पहाटेपासूनच देवाच्या

मुंबई - नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात सर्वचजण रंगून गेले होते. वर्षाअखेरीच्या पार्ट्या आणि कार्यक्रमाला मंगळवारच्या सायंकाळपासूनच सुरुवात झाली होती. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहरं रोषणाईने झगमगले होते. या रोषणाईत मंगळवारी आकाशातील आतषबाजीचीही भर पडली. मध्यरात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षावदेखील सुरू होता. त्यानंतर, नववर्षाच्या स्वागताची सकाळ बाप्पांच्या आशीर्वादाने झाल्याचं पाहायला मिळत आहेत. 

एकीकडे पार्ट्या करुन निवांत झोपलेले दिसतात, तर दुसरीकडे पहाटेपासूनच देवाच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी रांगेत उभारलेले दिसतात. शिर्डीतील साई मंदिरात आणि मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. नव वर्षाची सुरुवात, घेऊन बाप्पांचा आशीर्वाद असंच चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे देवदर्शनासाठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गर्दी होणार म्हणून मंदिर ट्रस्टनेही विशेष काळजी घेतली आहे. देशभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत होत आहे, त्यात धार्मिक भावही दिसून येत आहे. सोशल मीडियाही शुभेच्छांनी भिजून गेल्याचं पाहायला मिळत आहे. शिर्डी, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूरसह आप-आपल्या ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी गर्दी करत भाविकांकडून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात येत आहे.

सिद्धिविनायक मंदीराचे विशेष नियोजनश्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासतर्फे १ जानेवारी, २०२० रोजी गणपतीची आरती व दर्शनाच्या वेळा इत्यादींचा दिनक्रम आखण्यात आला आहे. पहाटे ४.१५ ते ५.१५ वाजेपर्यंत, सकाळी ६ ते दुपारी ११.५० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० ते सायंकाळी ७.१० वाजेपर्यंत आणि रात्री ८ ते ९.४५ वाजेपर्यंत वेळा ठेवण्यात आल्या आहेत. पहाटे ५.३० ते ६ वाजेपर्यंत आरती, दुपारी ११.५० ते १२.३० वाजता श्रींचा नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता धुपारती, सायं ७.३० ते रात्री ८ वाजता आरती आणि रात्री ९.४५ ते १० वाजता शेजारती होईल़

टॅग्स :सिद्धीविनायक देवस्थाननववर्षमुंबईपंढरपूरशिर्डी