...ही तर ‘न्यू इंडिया’ची सुरुवात
By Admin | Updated: April 2, 2017 00:11 IST2017-04-02T00:11:10+5:302017-04-02T00:11:10+5:30
छोट्या नावीन्यपूर्ण कल्पना नवीन बदल घडवून आणू शकतात. तरुणांकडे असलेला दृष्टिकोन, कल्पना, संशोधक वृत्तीच खरी देशाची संपत्ती आहे

...ही तर ‘न्यू इंडिया’ची सुरुवात
मुंबई : छोट्या नावीन्यपूर्ण कल्पना नवीन बदल घडवून आणू शकतात. तरुणांकडे असलेला दृष्टिकोन, कल्पना, संशोधक वृत्तीच खरी देशाची संपत्ती आहे. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. देशात कोट्यवधी लोक दररोज स्मार्ट फोनसह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आज देशातील तरुण या हॅकथॉनच्या माध्यमातून एकवटला आहे. या तरुणांचा एकत्रित विचार म्हणजे, ‘न्यू इंडिया’ची सुरुवात असल्याचे प्रतिपादन, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे देशभरात आयोजित करण्यात आलेल्या, ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन २०१७’ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी, माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आले. या वेळी अणुसंसाधन केंद्राचे आर. बालसुब्रमण्यम, आयआयटी बॉम्बेचे दीपक फाटक, आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे डॉ. आनंद देशपांडे, वेलिंगकरच्या स्थानिक कार्यकारी समितीचे अध्यक्ष एस. के. जैन, समूह संचालक डॉ. उदय साळुंखे उपस्थित होते. एकाच वेळी देशातील २६ केंद्रांमध्ये या हॅकथॉनचे उद्घाटन झाले असून, रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे यात सहभागी झालेल्या १० हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
हॅकथॉनच्या उद्घाटन प्रसंगी जावडेकर यांनी सांगितले, नावीन्यपूर्ण कल्पना आणि गुंतवणूक या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून, भारतात तयार झालेली उत्पादने हेच ‘मेक इन इंडिया’ आहे. यातूनच ‘न्यू इंडिया’ची सुरुवात होईल.
पुढचे ३६ तास विद्यार्थी मिळून अनेक समस्यांवर उपाय शोधणार आहेत. त्यामुळे यात सगळेच विजेते असणार आहेत. नवीन स्टार्ट अप सुरू होणे आवश्यक आहे. आयआयटीच्या हॉस्टेल रूममध्ये स्टार्ट अप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, सध्या ६०० स्टार्ट अप्स तिथे सुरू आहेत. नवीन संकल्पनांना मूर्त रूप दिल्याने अनेक समस्या सुटू शकतात.
सध्या देशासमोर अनेक समस्या व प्रश्न आहेत. तरुण वर्ग एकत्र येऊन हे प्रश्न तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोडवण्यासाठी काम करणार आहे. ४४ हजार विद्यार्थ्यांनी या हॅकथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी १० हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे सगळेच विजेते असल्याचे मत डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)