मल्हारच्या धुमशानला झाली सुरुवात
By Admin | Updated: August 15, 2014 05:35 IST2014-08-15T05:35:30+5:302014-08-15T05:35:30+5:30
तरुणाई ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असते, तो मल्हारचा उत्सव धुमशान धडाक्यात सुरू झाला आहे

मल्हारच्या धुमशानला झाली सुरुवात
मुंबई : तरुणाई ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असते, तो मल्हारचा उत्सव धुमशान धडाक्यात सुरू झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या मार्गदर्शनाने मल्हार २०१४ चा शुभारंभ झाला. कॉनक्लेव्हच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजन उपस्थित होते. देशभरात कौशल्यावर भर देण्याची गरज राजन यांनी बोलून दाखवली. अन्यथा रोजगार निर्मिती होणे शक्य नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
राजन पुढे म्हणाले की, पाश्चिमात्य देशात शिक्षणामुळे मोठी तफावत निर्माण होऊन रोजगारात असमानता निर्माण झाली. त्यामुळे तेथील लोकांनी शिक्षणावर अधिक भर देऊन स्किल्ड जॉब मिळवण्याकडे लक्ष दिले. त्यामुळेच तेथील शिक्षण भारतापेक्षा अधिक महागडे झाले. त्यामुळे आपणही कौशल्यांवर भर दिला तर रोजगार वाढेल.
‘कॅपिटॅलिझम, डेमोक्रॅसी अॅण्ड इनइक्वॅलिटी’ या विषयावर रघुराम यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय अर्थव्यवस्थेबरोबरच अमेरिका आणि युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्थेवर विचार व्यक्त केले. अमेरिकेत स्किल्ड जॉब आणि अनस्किल्ड जॉब असा भेद निर्माण होऊन त्याप्रमाणे रोजगाराच्या संधीमध्ये असमानता निर्माण झाली. शिक्षणामुळे परदेशात डॉक्टर, इंजिनीअर यांसारखे स्किल्ड जॉब निर्माण झाले. तसेच अनस्किल्ड जॉब जसे गार्डनर, कॉफी शॉपमध्ये काम करणारा व्यक्ती, कंपन्यांमध्ये काम करणारा मजूर अशी दरी निर्माण झाली. त्यामुळे तेथील लोकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करत स्किल्ड जॉब करण्याकडे भर दिला, असेही राजन म्हणाले.राहुल राम यांनी ‘रिवरबरेशन आॅफ काउंटर कल्चर’या संगीतमय कार्यक्रमात तरुणांना विदेशी संस्कृतीच्या संगीतावर ताल धरण्यास भाग पाडले. (प्रतिनिधी)