Join us

स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाल्यांचा अड्डा; स्वच्छतेचा अभाव, नागरिकांना ये-जा करणे अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:27 IST

काही ठिकाणी लोखंडाला गंज लागला आहे. दुर्दैव म्हणजे, एमएमआरडीए व महापालिकेनेही या स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने त्याची रया गेल्याचे चित्र आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई शहर आणि उपनगरांत बांधलेले स्कायवॉक आता गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा अड्डा बनले आहेत. त्यामुळे स्कायवॉकवर ठिकठिकाणी अस्वच्छता आहे. त्यामुळे त्यावरून ये-जा करणे नागरिकांना अवघड होत आहे. तर, काही स्कायवॉकची अवस्था दयनीय झाली आहे. काही ठिकाणी लोखंडाला गंज लागला आहे. दुर्दैव म्हणजे, एमएमआरडीए व महापालिकेनेही या स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने त्याची रया गेल्याचे चित्र आहे.

सांताक्रुझ पूर्वेत काम अर्धवटसांताक्रुझ पश्चिमेकडील स्कायवॉकवर फेरीवाले आहेत. त्याचा वापर नीट होत नाही. तर पूर्वेला बांधण्यात येत असलेल्या स्कायवॉकचे काम अर्धवट आहे.

वांद्रेतील स्कायवॉक कधी बांधणार?वांद्रे पूर्वेकडील म्हाडाला जोडणारा स्कायवॉक पाडण्यात आला आहे. हा स्कायवॉक कधी बांधणार? याचे उत्तर महापालिका आणि एमएमआरडीए देत नाही.

कुर्ल्यातील मागणी दुर्लक्षितकुर्ला पश्चिमेतील फेरीवाले, रिक्षा, बस आणि प्रवासी यांच्या गर्दीतून सुटका करण्यासाठी पालिकेच्या एल वॉर्डपर्यंत स्कायवॉक बांधण्याची मागणी नागरिक कित्येक वर्षांपासून करत आहेत. मात्र, त्याकडे कोणीच लक्ष देत नाही.

बोरीवली पश्चिमेकडील स्कायवॉकवर भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा कब्जा आहे. स्वच्छता तर येथे नावाला नाही. स्कायवॉकची अवस्था बिकट असून, नागरिकांना याचा त्रास होत आहे.- पंकज त्रिवेदी, मुंबई मार्च मोहीम

कांदिवलीच्या स्कायवॉकवर तर दिवसाही गर्दुल्ले आणि भिकारी असतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हेच चित्र आहे. त्यामुळे स्कायवॉक नागरिकांना चालण्यासाठी बांधले आहेत की गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांसाठी बांधले आहेत हेच समजत नाही.- विनोद घोलप, अध्यक्ष, फाईट फॉर राईट फाउंडेशन

विद्याविहार, भांडुप आणि घाटकोपर येथील स्कायवॉकचा वापर नागरिकांकडून होत नाही. काही ठिकाणी फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. विद्याविहार येथील स्कायवॉकच्या पायऱ्यांवरील लाद्या तुटल्या आहेत. - अंकुश कुराडे, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वाभिमानी भारतीय पँथर 

टॅग्स :मुंबईप्रवासी