लाचखोर बनला ‘सहायक आयुक्त’
By Admin | Updated: January 9, 2015 01:44 IST2015-01-09T01:44:13+5:302015-01-09T01:44:13+5:30
लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतरही अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध निरीक्षकाला सहायक आयुक्त पदावर बढती दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लाचखोर बनला ‘सहायक आयुक्त’
श्रीनारायण तिवारी ल्ल मुंबई
लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतरही अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध निरीक्षकाला सहायक आयुक्त पदावर बढती दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे सहायक आयुक्तावर बढती मिळाल्यानंतरही सवयीप्रमाणे या महाशयाला १५ डिसेंबर २०१४ रोजी लाच घेताना पुन्हा रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकारानंतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केले आहे़
एफडीएच्या मते,तत्कालीन औषध निरीक्षक जी. एल. कुरकुटे याला ४ मे १९९९ रोजी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. मात्र, पदाच्या बळावर त्याने तपासावर प्रभाव टाकत आपल्या पदोन्नतीत अडथळा येणार नाही, असा अहवाल तयार करून घेतला. त्यानंतर सहायक आयुक्त पदावर बढती देण्यात आली़ आर्श्चयाची बाब म्हणजे एकूणच या प्रकरणाबाबत वरिष्ठ पातळीवरील अधिकारी अनभिज्ञ होते़
लाचखोरांना बाहेरचा रस्ता
एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची ‘सेवा समाप्त’ करण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कुरकुटेने १९९९ च्या प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोषत्व प्रमाणपत्र सादर केले होते. त्यामुळे त्याला बढती मिळाली होती. आता पुन्हा यातून त्याची सुटका होणे कठीण असल्याचे विधि आणि न्याय विभागाचे संयुक्त आयुक्त एस.आर. साळुंखे यांनी स्पष्ट केले.
फेरतपासणीचे आदेश
एफडीए सूत्रांच्या मते, आयुक्त डॉ़ पुरुषोत्तम भापकर यांनी एसीबीच्या ट्रॅपची माहिती मिळताच कुरकुटे यांना तात्काळ निलंबित केले. एवढेच नव्हे तर अशा प्रकारची सर्व प्रकरणे तात्काळ आपल्यापुढे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. २०१४ मध्ये राज्याचे एकूण आठ अधिकारी व कर्मचारी लाचेच्या सापळ्यात अडकले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे यापैकी अनेक अधिकारी आपल्या पदाचा वापर करून पुन्हा कामावर परतले आहेत. विद्यमान आयुक्तांनी त्या सर्व प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
लाचेच्या सापळ्यात अडकलेले अधिकारी
श्रीमती एस. एस. खटावकर (अन्न सुरक्षा अधिकारी १३ मार्च २०१४)
एम. व्ही. देशपांडे (ड्रग इन्स्पेक्टर २६ मार्च २०१४)
श्रीमती आर. टी. सावंत (अन्न सुरक्षा अधिकारी ३० एप्रिल२०१४)
एन. के. भेंडकर (सेवक ३० एप्रिल २०१४)
यू. आर. कावळे (अन्न सुरक्षा अधिकारी २० मे २०१४)
ए. एन. आठवले (अन्न सुरक्षा अधिकारी १६ जून २०१४)
जी. एल. कुरकुटे (सहायक आयुक्त १५ डिसेंबर २०१४)
ए. एल. खडसे (शॉर्टहँड आॅपरेटर १५ डिसेंबर २०१४)