जयंतरावांच्या संकेतांमुळे संशयकल्लोळ
By Admin | Updated: August 18, 2014 23:56 IST2014-08-18T23:41:54+5:302014-08-18T23:56:40+5:30
तर्कवितर्क सुरू : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये रंगली चर्चा

जयंतरावांच्या संकेतांमुळे संशयकल्लोळ
सांगली : भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील जयंतरावांची हजेरी आणि त्याठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत त्यांनी व्यक्त केलेले संकेतात्मक भाकीत, यामुळे जिल्ह्यात नवा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आता त्यांच्या वक्तव्यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्तेही धास्तावले आहेत.
भाजपने रविवारी राम नाईक यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेतील या सर्वांच्या नावानेच चर्चेला उधाण आले होते. सत्कार राज्यपालांचा असला तरी, आयोजन भाजपचे होते. त्यामुळे जयंतरावांच्या उपस्थितीवरून संशयकल्लोळ निर्माण झाला होता. त्याबाबतची चर्चा सुरू असतानाच जयंतरावांनी विधानसभा निकालाबाबत अप्रत्यक्षपणे काही संकेत दिल्यामुळे कार्यकर्त्यांमधून आधीच व्यक्त होत असलेल्या संशयाला आणखी बळ दिले. ‘मला उत्तर प्रदेशचे राजभवन पाहायचे आहे. गेल्या अनेक वर्षात राजकीय व्यापामुळे ते शक्य झाले नाही. आता वेळच वेळ मिळण्याची शक्यता आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली.
आज, सोमवारी दिवसभर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पक्षीय कार्यालयांमध्ये आणि नेत्यांमध्ये जयंतरावांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू होती. त्यांच्या वेळेचा आणि राज्यातील सत्ताबदलाचा मेळ आता घातला जात आहे. त्यांच्या अस्पष्ट मतांमधील स्पष्ट अर्थ शोधण्यासाठी नेते व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जयंतरावांचा समावेश असल्याने त्यांच्या या वाक्याने इच्छुक उमेदवारांचे समर्थकही हवालदिल झाले आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले बहुतांश नेते जयंतरावांशी जवळीक असणारे आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जयंतरावांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला होता. या सर्व नेत्यांना त्यांचे पाठबळ असावे, असाही तर्क लढविला जात होता. त्यातच त्यांनी भाजपच्या कार्यक्रमात व्यक्त केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजविली आहे.
सांगली जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजप, शिवसेनेत दाखल होत आहेत. पक्षीय कार्यालयातही फारसे चैतन्य दिसत नाही. अशातच जयंतरावांच्या भूमिकेवरून कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्था वाढली आहे. काँग्रेस नेत्यांना, इच्छुकांनाही जयंतरावांच्या भूमिकेमागचे रहस्य उलगडत नसल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
फोरमशी सलगी
दुष्काळी फोरममधील खासदार संजय पाटील, अनिल बाबर, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. जगताप यांची हकालपट्टी केली आहे. तरीही गत महिन्यात दुष्काळी फोरमच्या बहुतांश नेत्यांनी जयंतरावांची भेट घेऊन चर्चा केल्यामुळे त्यांची या नेत्यांशी असलेली सलगी स्पष्ट झाली. राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर टीका केली, तरीही दुष्काळी फोरमने त्यांच्याविषयी बोलण्यास नकार दिला होता
डांगेंकडूनही तोच कित्ता
जयंतरावांनी भाजपच्या कार्यक्रमात संशय निर्माण केला असताना, त्याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अण्णा डांगे यांनीही भाजपप्रेमाचे किस्से सांगितले. पक्ष सोडला तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना माझा विसर पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लग्न एकाशी आणि प्रेम दुसऱ्याप्रती व्यक्त करण्याच्या या प्रकाराने कार्यकर्ते अवाक् झाले.