कचराळी तलावाचे २कोटींत सुशोभीकरण
By Admin | Updated: February 11, 2015 23:02 IST2015-02-11T23:02:27+5:302015-02-11T23:02:27+5:30
महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावाचा येत्या काही महिन्यांत कायापालट होणार आहे. त्याचे सुशोभीकरण करताना येथे ५०० मीटरचा

कचराळी तलावाचे २कोटींत सुशोभीकरण
ठाणे : महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावाचा येत्या काही महिन्यांत कायापालट होणार आहे. त्याचे सुशोभीकरण करताना येथे ५०० मीटरचा आॅलिम्पिकच्या धर्तीवरील जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार असून यावर रबरराइज पद्धतीचे ट्रॅक टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येथे जॉगिंग करणाऱ्या खासकरून ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखी अथवा सांधेदुखीचा त्रास होणार नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
या तलावात सध्या उद्यान, गणपती मंदिर, सार्वजनिक शौचालय आणि नागरिकांना बसण्यासाठी कट्टे आणि पदपथ अशा सुविधा आहेत. परंतु, त्यांची अवस्था बिकट झाल्याने आता पालिकेने या तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून त्यादेखील अंतिम झाल्या आहेत.
पुढील महिन्यात येथील कामांचा नारळ फुटणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. सुशोभीकरणाच्या कामासाठी १ कोटी ८२ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. यामध्ये तलावाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून मंदिराच्या बाजूला वाचनालय, ज्येष्ठांसाठी खुली व्यायामशाळा तसेच दोन ठिकाणी अत्याधुनिक गॅझीबो स्वरूपाची बैठक व्यवस्था तयार करण्यात येणार
आहे.
याशिवाय, तलावाच्या आतील बाजूस कारंजे उभारण्यात येणार आहे. यामध्ये तीन रंगांचे पॅटर्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक १० सेंकदांनी यामधून विविध रंगांची उधळण होणार आहे. तसेच येथील शौचालयाची देखील दुरुस्ती करण्यात येणार आहे. असेच सुशोभिकरण उर्वरित तलावांचेही करण्यात यावे अशी ठाणेकरांची मनपूर्वक इच्छा आहे. (प्रतिनिधी)