मुंबईतील किनारे होणार सुरक्षित

By Admin | Updated: April 27, 2015 04:43 IST2015-04-27T04:43:57+5:302015-04-27T04:43:57+5:30

दरवर्षी पावसाळा, दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात मुंबईतील सहा समुद्रकिनाऱ्यांवर बुडण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने पालिकेवर टीकेची झोड

The beaches of Mumbai will be safe | मुंबईतील किनारे होणार सुरक्षित

मुंबईतील किनारे होणार सुरक्षित

मनोहर कुंभेजकर, मुंबई
दरवर्षी पावसाळा, दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात मुंबईतील सहा समुद्रकिनाऱ्यांवर बुडण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने पालिकेवर टीकेची झोड उठवली जायची. या किनाऱ्यांवर तैनात असलेल्या जीवरक्षकांकडे आत्तापर्यंत पुरेशी सुरक्षा साधनेच उपलब्ध नव्हती. ‘लोकमत’ने सातत्याने यावर प्रकाशझोत टाकला होता. अखेर पालिकेच्या अग्निशमन दलाकडे नुकतीच सुमारे ३.५ कोटींची १२ महत्त्वाची सुरक्षा साधने उपलब्ध झाली आहेत. विशेष म्हणजे या साधनांसाठी किनाऱ्यांवर सुसज्ज असे टॉवर्सही उभारण्यात येणार आहेत.
या सुरक्षा साधनांमुळे समुद्रात बुडणाऱ्या घटनांवर जीवरक्षकांना नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या या सुरक्षा साधनांची मुंबई महापालिकेने खरेदी केल्यामुळे मुंबईतील सहा किनाऱ्यांवरची सुरक्षा मजबूत होणार आहे.
अग्निशमन दल आगामी पावसाळ्यासाठी सज्ज झाले आहे. अग्निशमन दलाने पूरनियंत्रण विमोचन पथकाच्या सुमारे १०० जणांच्या टीमला ही सुरक्षा साधने कशी हाताळायची याचे प्रशिक्षण दिले आहे. अजून एफआरटीच्या ५० जणांच्या टीमला हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी किनाऱ्यांवर होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता बुडण्याच्या घटनांवर लक्ष देण्यासाठी अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांच्या मदतीला एफआरटीची टीम सज्ज असते. गोव्यातील किनारे पोहण्यासाठी सुरक्षित असले, तरी मुंबईच्या किनाऱ्यांची भौगोलिक स्थिती पाहता हे किनारे पोहण्यासाठी खूप धोकादायक आहेत. ज्या ठिकाणी जीवरक्षक नाहीत, त्या ठिकाणी पर्यटक पाण्यात उतरत असल्याने बुडून मृत्यू होण्याचा धोका कैकपटीने वाढतो. गेल्या शनिवारी आक्सा बीचनजीक दाणापाणी येथील समुद्रात इजाज ऊल या रिक्षाचालकाचा बुडून मृत्यू झाला. बऱ्याच वेळा बुडण्याच्या घटना पर्यटक मद्यप्राशन करून समुद्रात पोहायला उतरल्यामुळे होतात. पालकांनी मुलांना समुद्रात पोहण्यापासून प्रवृत्त करणे आणि पर्यटकांनीदेखील समुद्रात पोहणे टाळण्याची गरजेचे असल्याचे मत रहांगदळे यांनी शेवटी व्यक्त केले.

Web Title: The beaches of Mumbai will be safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.