चाळींवर टाच, बंगल्यांकडे कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2015 23:36 IST2015-07-15T23:36:36+5:302015-07-15T23:36:36+5:30
सफाळे येथील सरकारी जमिनीवर सुरु असलेल्या चाळीच्या बांधकामावर महसूल विभागाने कारवाई केली असली तरी त्या शेजारीच सुरु असणाऱ्या बंगल्याकडे मात्र कानाडोळा करण्याचा प्रकार घडला आहे.

चाळींवर टाच, बंगल्यांकडे कानाडोळा
पालघर : सफाळे येथील सरकारी जमिनीवर सुरु असलेल्या चाळीच्या बांधकामावर महसूल विभागाने कारवाई केली असली तरी त्या शेजारीच सुरु असणाऱ्या बंगल्याकडे मात्र कानाडोळा करण्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे चाळीच्या बांधकामा विषयी येथील माजी सरपंचाने आवाज उठविल्यानंतर सुद्धा कारवाई झाली नव्हती. मात्र विधीमंडळात या विषयी चर्चा झाल्या नंतर प्रशासन कामाला लागले होते.
कपासे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. १२० मध्ये सरकारी जागेत बेकायदा चाळी उभारण्याचे काम सुरु होते. तर त्या शेजारीच आदिवासींच्या जागेवर विनापरवानगी बंगल्याचे काम सुरू असून त्यावर कारवाई केली जात नसल्याने महसूल विभागावर संशय व्यक्त केला जात आहे. येथे दुग्ध प्रकल्प विभागाच्या मालकीची सुमारे शंभर एकर जागा असून यातील काही जागेवर आदिवासी समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केल्याने त्या नियमाप्रमाणे नियमानुकूल करून देण्यात आल्या होत्या. या आदिवासींच्या जमीनी अल्पमोबदल्यात वसई तालुक्यातील वालीव, गोखिवरे आदी भागातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ( शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर) खरेदी करून त्यावर व्यवसायीक गाळे व चाळी उभारण्याचे काम हाती घेतले होते.
या बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी कपासे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच गजानन पागी यांनी तहसीलदार यांच्या केडे केली होती. या बांधकामाबाबत राष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांंच्या आदेशान्वये तलाठी सोपान पवार यांनी चाळींचे बांधकामे तोडून टाकली. परंतु याच जागेमध्ये बंगले बांधण्याची कामे हाती घेतल्याची तक्रार स्थानिकांनी केल्या आहेत. (वार्ताहर)
अशी ही चाल ढकल
या बंगल्याच्या बांधकामाना कपासे ग्रामपंचायतीकडून नाहरकत दाखला देण्यात आला नसल्याचे ग्रामसेविका सुचीता पाटील यांनी लोकमतला सांगितले तर तलाठी सोपान पवार यांच्याशी संपर्क साधला असता या बांधकामासंदर्भात मला कल्पना नाही. त्या अनधिकृत बंगल्यासंदर्भात कागदपत्रे माझ्या कार्यालयात आणून दिल्यास कारवाई संदर्भात विचार केला जाईल, असे सांगितले.