Join us  

दुसऱ्या लाटेत नंबर लागणार नाही याची काळजी घ्या; पालिका सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 7:34 AM

कोरोनामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना, सील झोनबाबत महापालिका व पोलीस यांनी संयुक्तपणे ड्रोन व सीसीटीव्हीसारख्या माध्यमातून जनजागृती हाती घेतली आहे. लक्षणे आढळून येणाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षांत स्थानांतरित करण्यात येत आहे.

मुंबई : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रशासन सज्ज आहे. रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपला नंबर लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहेे. 

मार्चपासून मुंबईत काेराेना संसर्गाचा धाेका सुरू झाला. सुरुवातीला मुंबईतील रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक होती. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सर्वस्तरीय अंमलबजावणी व वैद्यकीय औषधोपचार सातत्याने करण्यात आले. दिवाळी आणि हिवाळा हे दोन्ही घटक डोळ्यासमोर ठेवून आता कोरोना चाचण्या आणखी वाढविण्यात आल्या असून, दिल्लीसारखी मुंबईची स्थिती होऊ नये म्हणून वेगाने कार्यवाही सुरू झाली आहे. दिवाळीनंतर रस्ते, विमान आणि रेल्वे मार्गाने मुंबईत बाहेरगावाहून दाखल हाेणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. 

लोकांना शक्यतो घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात येत होत्या आणि येत आहेत. मदतीसाठी हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत. लोकल, शाळा यावर बंधने आहेत. संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी व पडताळणी सातत्याने करण्यात येत आहे. आरटीपीसीआर चाचण्‍यांवर भर देण्‍यात येत आहे. फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. 

सील झोनबाबत महापालिका व पोलीस यांनी संयुक्तपणे ड्रोन व सीसीटीव्हीसारख्या माध्यमातून जनजागृती हाती घेतली आहे. लक्षणे आढळून येणाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षांत स्थानांतरित करण्यात येत आहे. सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने व नियमितपणे सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांचे सर्वेक्षण केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे नागरिक मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी आढळून येतील, त्यांना दंड आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळेच काेराेना संसर्ग नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.

हिवाळ्यात प्रदूषणाचा धोकातापमान व कोविड यांचा थेट संबंध नसला तरी हिवाळ्यात लोकांचे हात धुण्याचे प्रमाण कमी होते, त्याचबरोबर कपडे सातत्याने बदलण्याचे टाळले जाते. यामुळे संसर्गात वाढ होऊ शकते. हिवाळ्यादरम्यान दरवर्षी प्रदूषण पातळी वाढत असल्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका