Join us  

सावधान ! लालबागला राजाच्या दर्शनानं भाविकांचं भरलं मन, पण खिसे झाले रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 2:06 PM

लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी झाली आहे. राजाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी भाविकांचा जल्लोष सुरू आहे. मात्र भाविकांनो, जल्लोष सुरू असताना जरा सावधानताही बाळगा. कारण या गर्दीत मोबाइल व पाकीट चोरांचा सुळसुळाट झाला आहे. 

चेतन ननावरे / मुंबई, दि. 5 - लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी झाली आहे. राजाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी भाविकांचा जल्लोष सुरू आहे. मात्र भाविकांनो, जल्लोष सुरू असताना जरा सावधानताही बाळगा. कारण या गर्दीत मोबाइल व पाकीट चोरांचा सुळसुळाट झाला आहे. काळा चौकी पोलीस ठाण्यात गणेश भक्तांनी मोबाइल, पाकीट चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी 18 ते 30 या वयोगटातील आहेत. यातील काही संशयित हे मालेगावमधील असल्याचीही माहिती समोर आली आहे.  तर एका संशयिताला भाविकांनी बेदम मारहाणदेखील केली आहे. या संशयिताला चोरी करताना रंगेहाथ पकडल्याचा दावा या भाविकांनी केला आहे. मंगळवारी (5 सप्टेंबर) सकाळपासून गणेश भक्त आपल्या किंमती वस्तू चोरीला गेल्याच्या तक्रारी घेऊन काळा चौकी पोलीस ठाण्यात दाखल होते आहेत. दरम्यान, काळा चौकीतील बहुतांश पोलीस हे गणपती विसर्जन मिरवणुकीत कार्यरत असल्यानं पोलीस स्टेशनमध्ये कर्मचा-यांची कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांची तक्रार घेताना तारांबळ उडू नये, यासाठी पोलिसांकडून तक्रारीसाठी आलेल्या गणेश भक्तांना टोकन क्रमांक देण्यात आले आहेत.  

टॅग्स :गणेशोत्सव