सावधान ! ऐन गणपतीपूर्वी विषारी जेली फिशची दहशत
By Admin | Updated: August 17, 2014 23:54 IST2014-08-17T23:10:26+5:302014-08-17T23:54:00+5:30
ऐन गणपती उत्सवाच्या आधी मुंबईतील समुद्र किनार्यांवर पुन्हा एकदा विषारी जेली फिशची दहशत निर्माण झाली आहे.

सावधान ! ऐन गणपतीपूर्वी विषारी जेली फिशची दहशत
मुंबई,मनोहर कुंभेजकर -
ऐन गणपती उत्सवाच्या आधी मुंबईतील समुद्र किनार्यांवर पुन्हा एकदा विषारी जेली फिशची दहशत निर्माण झाली आहे. समुद्राच्या पाण्याबरोबर मुंबईच्या विविध समुद्रकिनार्यांवर निळ्या रंगाचे विषारी जेली फिश आल्याने पर्यटकांमध्ये घबराट पसरली आहे. अक्सा बीचवर पाण्यात उतरलेल्या ३-४ जणांना विषारी जेली फिश चावले आहेत. जेली फिशच्या चाव्यामुळे शरीराला जखम होऊ नये, म्हणून पालिकेची सर्व यंत्रणा आणि जीवरक्षक समुद्रकिनारी करडी नजर ठेवत असून पर्यटकांना पाण्यात उतरण्यास मज्जाव करत असल्याचे चित्र आज अक्सा समुद्रकिनारी पाहायला मिळाले. बरोब्बर गेल्या वर्षी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी विषारी जेली फिशची दहशत निर्माण झाली होती.
समुद्राचे पाणी आणि विषारी जेली फिश यांच्या रंगात साधर्म्य आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यात उतरल्यास पर्यटकांना जेली फिश जवळ आल्याचे समजून येत नाही. मात्र त्याने जोरात चावा घेतल्यानंतर त्याची दाहकता लक्षात येते. निळ्या रंगाचा आणि फुग्याच्या आकाराचा असलेल्या या विषारी जेली फिशला एक छोटा आणि एक मोठा दोरा असतो. मोठा दोरा हा विषारी असून तो पायाला चावल्यास गुप्तस्थळी आणि हाताला चावल्यास काखेत गाठ येते. या जेली फिशची लांबी २ इंच असून रु ंदी अर्धा इंच असल्याची माहिती पालिकेचे निवृत्त आणि ३६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी दिली. माशेलकर आजही निवृतीनंतर एक सामाजिक बांधिलकी म्हणून अक्सा समुद्रकिनारी गस्त घालतात.
समुद्र किनार्यावर आल्यावर जेली फिशचे अर्धे आयुष्य संपलेले असते. मात्र तरी त्याचा चावा असह्य असतो. सुमारे एक तास या चाव्याचा वेदना राहतात. जेली फिश चावल्यावर लिंबू, शेण जखमेच्या जागी लावल्यास त्याची दाहकता काही प्रमाणात कमी होत असल्याचेही माशेलकर यांनी सांगितले.
दरम्यान, पालिकेच्या पी (उत्तर)विभागाचे सहायक पालिका आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी समुद्रात विषारी जेली फिश असल्याने पर्यटकांनी पाण्यात उतरू नये, अशा प्रकारचे फलक त्यांनी अक्सा किनारी लावलेले आहेत. येथे पालिकेचे ८-९ जीवरक्षक,पी(दक्षिण) आणि पी(उत्तर)चे असे मिळून २० सिव्हील डिफेन्सचे कर्मचारी, अग्नीशामक दलाचे रुग्णवाहिकेसह ७ जवान, एनडीआरचे ५ जवान अशी मोठी फौजच अक्सा किनारी दिसून आली.