Join us  

बीडीडीतील रहिवाशांना लॉटरी पद्धतीने घराचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 2:16 AM

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये रहिवाशांच्या कायदेशीर सुरक्षेसाठी म्हाडाकडून भविष्यात आॅनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे.

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये रहिवाशांच्या कायदेशीर सुरक्षेसाठी म्हाडाकडून भविष्यात आॅनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे. रहिवाशांना मिळणारे घर नेमके कुठे असेल, कोणते असेल, ते कोणत्या मजल्यावर असेल, तसेच सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात येतील, याची संपूर्ण खात्री पटण्याचा मार्ग म्हाडाने खुला केला आहे.वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मोठा प्रकल्प म्हाडामार्फत राबविण्यात येत आहे. यातील ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. आतापर्यंत २५० कुटुंबीयांनी प्रकल्पामध्ये सहभागी होण्यास संमती दिल्याने त्यांना संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतर  केले आहे. मात्र, या पुढील टप्पा म्हणून म्हाडाकडून प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्यांची लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे. यासह त्यांच्या घराच्या सर्व कायदेशीर बाबी ही पूर्ण करण्यात येतील, या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.म्हाडाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून तयारीदेखील सुरू करण्यात आली असून, ही लॉटरी पूर्णपणे पारदर्शक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कायदेशीर बाबीसुद्धा म्हाडाकडून पूर्ण केल्या जाणार आहेत. रहिवाशांना कोणत्याच प्रकारची अडचण राहणार नाही, याची काळजी म्हाडा घेणार आहे.

टॅग्स :घरमुंबई