बविआ, सेना-भाजपात खरी झुंज

By Admin | Updated: June 4, 2015 22:36 IST2015-06-04T22:36:48+5:302015-06-04T22:36:48+5:30

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यावेळी बहुजन विकास आघाडी, सेना-भाजपा युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, जनतादल, रिपाइं व बसपा असे पक्ष रिंगणात उतरले आहेत.

Baviia, the real battle between the army and the BJP | बविआ, सेना-भाजपात खरी झुंज

बविआ, सेना-भाजपात खरी झुंज

दीपक मोहिते - वसई
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यावेळी बहुजन विकास आघाडी, सेना-भाजपा युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, जनतादल, रिपाइं व बसपा असे पक्ष रिंगणात उतरले आहेत. परंतु खरी लढत बहुजन विकास आघाडी व सेना-भाजपा युतीमध्येच आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. सेना-भाजपानेही आपापल्या जागा लढवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु काही ठिकाणी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले तर, काही उमेदवारांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सेना-भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज फेटाळले जाणे,काहींनी अर्ज अचानक मागे घेणे यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहे. भाजपने मागीतल्याप्रमाणे त्यांना जागा देण्यात आल्या परंतु मिळालेल्या सर्व जागांवर ते आपले उमेदवार उभे करू शकले नाहीत. त्यामुळे सेनेच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे.
दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने मात्र रिपाइंकरिता काही जागा सोडल्या. त्यापैकी एका जागेवर रिपाइंचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. पक्षाने काँगे्रसच्या एका विद्यमान नगरसेविकेला आपल्या पक्षाचे तिकिट दिले आहे.
गेली अनेक वर्षे ती नगरसेविका तत्कालीन नगरपरिषद व महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. सेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून बहुजन विकास आघाडीमध्ये असा राजकीय प्रवास करणाऱ्या या नगरसेविकेला बहुजन विकास आघाडीने तिकिट देऊन आपलेसे केले आहे. लोकहितवादी पार्टीनेही वसईच्या ग्रामीण पट्ट्यात काही जागा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या माजी जिल्हापरिषद सदस्याला आपल्यात सामावून घेतले आहे.
गेल्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर लढणारे हे महाशय सध्या लोकहितवादी लिडर पार्टीच्या तिकिटावर आपले नशिब आजमावत आहेत. एकंदरीत निवडणुकीचे चित्र लक्षात घेता काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस हे दोन्ही पक्ष तिसऱ्या किंवा चवथ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता
आहे.
७ लाख मतदार या निवडणुकीत आपले ११५ प्रतिनिधी निवडणार आहेत. निवडणूक शांततेत व योग्य पद्धतीने व्हावी याकरिता निवडणूक यंत्रणेने प्रयत्न सुरु केले आहे. अनेक प्रभागामध्ये दुरंगी, तिरंगी लढती होणार आहेत. निवडणूक यंत्रणेबाबत उमेदवार व मतदार दोघेही नाराज आहेत. निवडणूक संबंधीची कोणतीही माहिती वेळेवर मिळत नसल्याने उमेदवारासहीत त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील हवालदिल झाले आहेत. मतदारयादीतील घोळ अद्यापही संपला नसल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांची धावपळ होणार आहे. याकडे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग दुर्लक्ष करीत आहेत.

रात्री उशिरापर्यंत प्रचार
रणरणत्या उन्हामध्ये प्रचार करताना उमेदवारांचा जीव अक्षरश: कासावीस होत आहे. प्रचारातील अर्धी शक्ती उन्हामुळे खच्ची होत असल्याची खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. सकाळी मतदारांच्या भेटी घेणे अशक्य होत असल्याने सायंकाळी उमेदवार आवर्जून मतदारांची भेट घेत आहेत. भेटीगाठीचा हा कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत सुरू आहे. सकाळप्रहरी मतदार नोकरीवर जाण्याच्या घाईत असल्यामुळे उमेदवार सायंकाळी मतदारांना आपल्या पक्षाची भूमिका समजावून सांगत आहेत.गेल्या दोन दिवसांपासून सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. दिवसभर प्रचार करायचा व रात्री उशीरापर्यंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन दुसऱ्या दिवशी होणाऱ्या प्रचाराची रणनीती ठरवायची, असा नियोजनबद्ध कार्यक्रम उमेदवार राबविताना दिसत आहे.

६२७ मतदान केंद्रे
१४ जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेने ६२७ मतदान केंद्रे स्थापन केले आहेत. परंतु नालासोपारा शहरातील काही मतदान केंद्रासंदर्भात राजकीय पक्षांकडून आक्षेप नोंदविण्यात आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मतदानकेंद्रे हलवण्यासंदर्भात फेरविचार सुरू केला आहे. नालासोपारा पश्चिम विभागात समेळपाडा येथे आठवडीबाजार रविवारी भरतो. त्यामुळे येथे असलेल्या मतदानकेंद्रावर जाऊन मतदान करणे मतदारांना शक्य होणार नाही त्यामुळे एका राजकीय पक्षाने मतदानकेंद्र बदलण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत निवडणूक यंत्रणा फेरविचार करीत आहे. मतदानकेंद्र स्थापन करताना त्या विभागातील अडीअडचणी व मतदारांना होणारा त्रास याचा विचार करण्यात न आल्यामुळे मतदानकेंद्राबाबत फेरविचार करण्याची नामुष्की निवडणूक यंत्रणेवर आली आहे.

 

Web Title: Baviia, the real battle between the army and the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.