बविआला २९, पंजाला८ टक्के मते

By Admin | Updated: October 21, 2014 23:57 IST2014-10-21T23:57:47+5:302014-10-21T23:57:47+5:30

निकाल जाहीर होऊन पालघर जिल्हयातील राजकीय चित्र स्पष्ट झाले. सर्वांना संमिश्र यश मिळाले असून बहुजन विकास आघाडीने मात्र या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली.

Baviala 29, Panchal 8 percent of the votes | बविआला २९, पंजाला८ टक्के मते

बविआला २९, पंजाला८ टक्के मते

दीपक मोहिते, वसई
निकाल जाहीर होऊन पालघर जिल्हयातील राजकीय चित्र स्पष्ट झाले. सर्वांना संमिश्र यश मिळाले असून बहुजन विकास आघाडीने मात्र या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षासमोर आता अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. या पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मते लक्षात घेता काँग्रेस पक्षाला पक्ष बांधणीकडे जाणीवपुर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. काँग्रेस पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसची अशीच गत झाली आहे. पक्षवाढीकडे लक्ष न दिल्यामुळे निवडणुकीत काय होते याचा कटु अनुभव या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने घेतला. या अनुभवातून सुधारणा होईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
एकीकडे राष्ट्रीय पक्षाची वाताहात होत असताना बहुजन विकास आघाडी मात्र संपूर्ण जिल्हयात फोफावत आहे. भविष्यात जिल्हयातील सहाही जागा जिंकण्याच्या दृष्टीने आघाडीचे प्रमुख आ. हितेंद्र ठाकूर आतापासुनच कामाला लागले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. काँग्रेस पक्षाशी हात मिळवणी केल्यामुळे काँग्रेस पक्षावरचा राग आघाडीच्या उमेदवारावर निघाला व बळीराम जाधव यांचा पराभव झाला.
काँग्रेस पक्षाशी समझोता करण्याची हितेंद्र ठाकूर यांची खेळी धोकादायक ठरली. या निवडणुकीतही मोदीलाटेचा फटका बसेल असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत होता. परंतु त्याचा विशेष परिणाम पालघर जिल्हयातील सहा विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळाला नाही. बहुजन विकास आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी लक्षात घेता भविष्यात सर्वच राजकीय पक्षांसमोर आव्हान उभे राहणार आहे. एकुण १० लाख ७१ हजार ५६८ मतापैकी २९.६४ टक्के मते बविआच्या पारड्यात गेली. या पक्षाने डहाणू येथे आपला उमेदवार उभा केला नव्हता. तर काँग्रेस पक्षाला ८.४० टक्के मते मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत सहाही मतदारसंघात भाजपाची प्रचंड घसरण झाली. त्या पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतावरून या निवडणुकीत मोदी लाटेचा पर्दापाश झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने डहाणू व विक्रमगड या दोन मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले परंतु त्यांना ६० हजार मतांचा पल्ला गाठता आला. काँग्रेसचे राजेंद्र गावित वगळता अन्य उमेदवारांच्या अनामत रक्कमाही जप्त झाल्या आहेत. मार्क्स. कम्यु. ना बंडखोरीचा चांगलाच तडाखा बसला. त्यांच्या उमेदवाराला केवळ २८ हजार मताचा पल्ला गाठता आला.
एकंदरीत हे चित्र पाहता भविष्यात बहुजन विकास आघाडी आपले हातपाय अधिक जोमाने पसरतील अशी शक्यता आहे. या पक्षाचा पाठींबा मिळवण्यासाठी सध्या भाजप व अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी मात्र विविध विकासकामांना जो पक्ष प्राधान्य देईल त्याला आम्ही पाठींबा देऊ असे जाहीर केले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा सत्तेच्या राजकारणात शिरकाव होऊन एखादे राज्यमंत्रीपद त्यांच्या पदरी पडण्याची शक्यता अधिक आहे.

Web Title: Baviala 29, Panchal 8 percent of the votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.