सेना, भाजपामुळे बविआ विजयी

By Admin | Updated: October 27, 2014 00:55 IST2014-10-27T00:55:27+5:302014-10-27T00:55:27+5:30

नवीनिर्मित पालघर जिल्ह्यातल्या मतदारसंघात सेना आणि भाजपा यांच्याच उमेदवारांनी परस्परांची जबरी मते खाल्ल्याने तीन मतदारसंघात बविआचा विजय झाला आहे.

Bavia won by Army, BJP | सेना, भाजपामुळे बविआ विजयी

सेना, भाजपामुळे बविआ विजयी

वसई / पालघर : नवीनिर्मित पालघर जिल्ह्यातल्या मतदारसंघात सेना आणि भाजपा यांच्याच उमेदवारांनी परस्परांची जबरी मते खाल्ल्याने तीन मतदारसंघात बविआचा विजय झाला आहे. नालासोपारा येथे आमदार क्षितीज ठाकूर यांनी विक्रमी अशी ११३५६६ मते मिळवून विजय मिळविला. या मतदारसंघात भाजपाला ४७९२२ व सेनेला ४०३२१ अशी मते मिळालीत. दोन्हीही पक्षांना मिळालेल्या मतांची बेरीजही क्षितीज यांच्या मतांच्या जवळपास पोहचणारी आहे. त्यामुळे जर महायुती अस्तित्वात असती तर इथे चित्र वेगळे दिसू शकले असते. परंतु, या दोघांनीही स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने बविआच्या क्षितीज यांचा विक्रमी विजय अगदी सहज शक्य झाला. कॉंग्रेसच्या उमेदवारला येथे फक्त ४५५५ मते मिळाली. असेच वसईमध्ये घडले. बविआच्या हितेंद्र ठाकूर यांना ९७२९१ मते मिळालीत. तर येथे भाजपाने उमेदवारच उभा केला नव्हता. परंतु सेनेने समर्थन दिलेल्या पंडितांना ६५३९५ मते मिळालीत. जर येथे महायुती अस्तित्वात असती तर सेनेच्या उमेदवाराची मते वाढून चित्र वेगळे दिसले असते. असेच बोईसरमध्ये घडले आहे. तिथे बविआच्या तरेंना ६४५५०, भाजपाच्या उमेदवाराला ३०२२८ आणि सेनेच्या उमेदवाराला ५१६७७ मते मिळाली आहेत. या दोघांची बेरीज तरेंच्या मतांपेक्षा अधिक होते.
याच्या उलट स्थिती विक्रमगडमध्ये आहे. बविआच्या उमेदवाराने १८०८५ मते घेतल्याने तिथे भाजपाच्या विष्णू सावरा यांचा विजय घडून आला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडलेली ३२०५३ आणि सेनेच्या उमेदवाराला पडलेली ३६३५६ बघीतली तर बविआचा उमेदवार नसता तर येथे विजयाच्या पारडे सेनेच्या बाजूला झुकले असल्याची चिन्हे स्पष्टपणे जाणवतात म्हणजेच या मतदारसंघात बविआने भाजपाला विजयी केले. डहाणूमध्ये मार्क्सवाद्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची मते खाल्याने भाजपाचा विजय झाला आहे. भाजपाच्या धनारे ४४८४९ मते मिळालीत. तर राष्ट्रवादीला २७९६३ आणि काँग्रेसला १४१६६ अशी मते मिळालीत. येथे जर मार्क्सवादी स्पर्धेत नसते तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार येथे विजयी ठरला असता. परंतु, आघाडी नसल्याने सेना-भाजपा, व काँग्रेस-राष्ट्रवादी शुंभ-निशुंभांसारखे लढले आणि बविआला तीन ठिकाणी विजयी करून बसलेत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Bavia won by Army, BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.