कच-यावरून श्रेयाची लढाई
By Admin | Updated: November 30, 2014 23:19 IST2014-11-30T23:19:29+5:302014-11-30T23:19:29+5:30
दोन वर्षांपासून रखडलेल्या नवीन कचरा ठेकेदाराच्या फेरनिविदेचा प्रस्ताव पुढील आठ दिवसांत स्थायी समितीत येणार आहे.

कच-यावरून श्रेयाची लढाई
नवी मुंबई : दोन वर्षांपासून रखडलेल्या नवीन कचरा ठेकेदाराच्या फेरनिविदेचा प्रस्ताव पुढील आठ दिवसांत स्थायी समितीत येणार आहे. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघाल्याने त्याचे श्रेय लाटण्यासाठी नवी मुंबईत राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. शिवसेनेने शनिवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून हा प्रश्न तत्काळ सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची भेट घेतली. यावेळी एक महिन्यात कचरा प्रश्न सोडवा अन्यथा अधिकाऱ्यांना शहरात काम करून दिले जाणार नसल्याचा इशारा पालिका प्रशासनास दिला. तर हा विषय लवकरच स्थायी समितीमध्ये मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. पुढील दीड महिन्यात नवीन ठेकेदार नियुक्त केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. यावेळी विरोधी पक्ष नेत्या सरोज पाटील, विठ्ठल मोरे, विजय माने, विजयानंद माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पालिका प्रशासनाने पुन्हा निवीदा काढण्याची प्रक्रिया राबविली. आता पुढील आठ दिवसांमध्ये हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर येणार आहे. दोन वर्ष राजकीय पक्षांनी अपेक्षित पाठपुरावा केला नाही. परंतु हा प्रश्न सुटणार असल्यामुळे त्याच्या श्रेयासाठी सर्वांची धडपड सुरू झाली आहे. नजीकच्या काळात नवी मुंबईमध्ये कचऱ्यावरून राजकारण चांगलेच पेटणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)