Join us  

जलवाहिनी भूमिपूजन सोहळ्यावरून सेना-भाजपत रंगली श्रेयाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 1:59 AM

दहिसरमधील प्रकार : दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पार पडले उद्धाटन

मनोहर कुंभेजकर मुंबई : राज्यात भाजप व शिवसेना युती आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकाही युती एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी घोषित केले आहे. मात्र दहिसर विधानसभा मतदारसंघातील गणपत पाटील नगरला नवीन जलवाहिनी देण्याच्या भूमिपूजन सोहळ्यावरून सोमवारी शिवसेना व भाजपत श्रेयवादाची लढाई जुंपली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनीदेखील भाजप कार्यकर्त्यांच्या आणि येथील झोपडपट्टीधारकांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर पुन्हा येथून मनीषा चौधरीच निवडणूक लढविणार असल्याचा दावा भाजप कार्यकर्ते करीत आहे. त्यातच सोमवारी सकाळी १० वाजता म्हाडाचे सभापती व शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या हस्ते व प्रभाग क्रमांक १ च्या स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या आणि येथील स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत गणपत पाटील नगर झोपडपट्टीला ३० मीटर लांब ६ इंच व्यासाची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा व स्थानिक नागरिकांना पाण्याच्या मीटरचे वाटप झाले. झोपडपट्टीचा जल वनवास शिवसेनेच्या प्रयत्नाने संपला, असा दावा विनोद घोसाळकर यांनी केला.

तर येथील झोपडपट्टीवासीयांना पाणी आपल्या प्रयत्नानेच मिळणार असल्याचा दावा आमदार मनीषा चौधरी यांनी केला. तिवरांच्या जागेत उभी राहिलेली ही मोठी झोपडपट्टी असून त्यांना पाणी मिळावे म्हणून एक आमदार या नात्याने मी गेली ५ वर्षे सतत प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले. झोपडपट्टीवासीयांना वीज मिळण्यासाठी मी प्रयत्न करीत असताना सदर झोपडपट्टी सीआरझेडमध्ये येते, असा दावा करून मग त्या वेळी विरोध कोणी केला होता, असा सवाल मनीषा चौधरी यांनी केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप व शिवसेनेत मात्र जोरदार श्रेयवादाची लढाई जुंपली आहे.

धारावीनंतर मुंबईतील मोठी झोपडपट्टी म्हणून गणपत पाटील नगर ओळखले जाते. तिवरांच्या झाडांची कत्तल करून दहिसरच्या खाडीत गेल्या दोन दशकांत गणपत पाटील नगर उभे राहिले आहे. गेली अनेक वर्षे येथील झोपडपट्टीधारकांना पिण्याच्या पाण्याची सुविधाच नव्हती. दहिसर विधानसभेच्या भाजप आमदार मनीषा चौधरी व म्हाडाचे सभापती व शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर या दोन्ही नेत्यांनी आपल्या प्रयत्नाने या परिसराला पाणी मिळणार असल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :शिवसेनाभाजपा