लढाई प्रतिष्ठेची... अस्तित्वाची

By Admin | Updated: October 7, 2014 01:50 IST2014-10-07T01:50:49+5:302014-10-07T01:50:49+5:30

एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघावर २००९च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा फडकवत सेनेला धक्का दिला

Battle of prestige ... existence | लढाई प्रतिष्ठेची... अस्तित्वाची

लढाई प्रतिष्ठेची... अस्तित्वाची

तेजस वाघमारे, मुंबई
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघावर २००९च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा फडकवत सेनेला धक्का दिला. शिवसेना भवन, मनसेचे राजगड ही दोन प्रमुख पक्षांची कार्यालये याच मतदारसंघात असल्याने या मतदारसंघावर कब्जा करण्यासाठी सेना-मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली असून, यंदाची निवडणूक दोघांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
राजकीयदृष्ट्या हा मतदारसंघ अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो. यामुळेच येथील लढतीकडे सर्व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघावर १९९0पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या २००९च्या निवडणुकीत मनसे उमेदवार नितीन सरदेसाई विजयी झाले. मनसे उमेदवारांनी सेनेच्या मुंबईतील अनेक उमेदवारांना पराभूत करण्यात मोठा हातभार लावला. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाचा बदला घेण्यासाठी शिवसेना सर्व ताकदीनिशी मैदानात उतरली आहे.
२00९पर्यंत या मतदारसंघात दुहेरी लढत होत असे. परंतु यंदा युती - आघाडीचा घटस्फोट झाल्याने येथे पंचरंगी लढत होणार आहे. मनसेकडून नितीन सरदेसाई, शिवसेनेकडून सदा सरवणकर, काँग्रेसकडून प्रवीण नाईक, राष्ट्रवादीकडून वामन परब, भाजपाकडून विलास आंबेकर हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांसह एकूण ९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे यांनी सर्वाधिक ७४ हजार ६५७ मते या मतदारसंघातून घेतली आहेत. तर मनसे उमेदवाराला २५ हजार ८९५ मते मिळाली आहेत. यातून या मतदारसंघातील मतदार शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसते. या पराभवाचा धसका घेऊन मनसे उमेदवार सरदेसाई यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेनेही तगडा उमेदवार रिंगणात उतरविल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत पाहण्यास मिळणार आहे.
या मतदारसंघात उच्चवर्गीय ते सर्वसामान्य मतदार आहेत. हे मतदार विचारपूर्वक मतदान करीत असल्याने येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २ लाख ३0 हजार ६0 मतदार विधानसभेसाठी मतदान करणार असून, यामध्ये १ लाख १७ हजार ५0९ पुरुष आणि १ लाख १२ हजार ५३३ महिला व इतर मतदार आहेत.
या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. एकूणच राजकीयदृष्ट्या हा मतदारसंघ अतिशय संवेदनशील समजला जातो. येथे घडणाऱ्या घडामोडींचे प्रतिबिंब राजकीय वर्तुळात उमटत असते. हा पट्टा मराठी भाषिक असल्याने साहजिकच निवडणूक रिंगणातील प्रमुख पाच उमेदवारही मराठी आहेत. परंतु, मनसे आणि शिवसेनेमध्ये या मतांचे विभाजन होणार आहे. तसेच हिंदुत्ववादी विचाराचे मतदारही अधिक असून, ते भाजपाकडे वळू शकतात. याचा कोणताही फटका शिवसेना, मनसे उमेदवाराला बसणार नसल्याचे दिसते. यामुळे येथील लढत ही शिवसेना - मनसे उमेदवारांमध्येच होणार आहे.

Web Title: Battle of prestige ... existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.