मुंबई-उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचाराचा नारळ शनिवारी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांच्या हस्ते वाढवण्यात आला. या मतदार संघातील लढाई असली विरुद्ध नकली अशी आहे, असा टोला त्यांनी लगावला. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ काल संध्याकाळी महायुतीची जाहिर सभा गोरेगाव बांगूर नगर येथे संपन्न झाली. ही लोकसभेची निवडणूक असली आणि नकलीमधली लढाई आहे. पाकिस्तानची भाषा बोलणारे आणि दहशतवाद्यांना घरात घुसून मारणाऱ्यांमधली ही लढाई आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून मतदारांनी असली शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन यावेळी केले.
ज्या काँग्रेसने मुंबईला केंद्रशासित केले, महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्या काँग्रेसने आंदोलन करणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या, त्या काँग्रेसशी उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी केली आहे. त्यामुळे मराठी माणसाचे काँग्रेसच्या हाताला लागलेले रक्त उद्धव ठाकरे यांच्या हातालाही लागले आहे.त्यामुळे त्यांची शिवसेना नकली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसशी कधीच हात मिळवणी केली नाही. त्यांची असली शिवसेना आज आमच्या सोबत आहे असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या सोबत संसदेत काम करण्याची मला संधी मिळाली. 370 कलम हटवले गेले, असे अनेक ऐतिहासिक निर्णय झाले, त्या ऐतिहासिक निर्णयांचा मला साक्षीदार होता आले, नरेंद्र मोदी यांनी केलेली देशातील कामे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली कामे तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे ती फक्त लोकांपर्यंत पोहोचवा, गैरसमज दूर करा, लोकांशी संवाद साधा, आपला विजय निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर,आमदार डॉ.भारती लव्हेकर,आमदार राजहंस सिंह, यांच्यासह शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.