ज्येष्ठांना ‘एसटी’चा आधार
By Admin | Updated: January 9, 2015 22:40 IST2015-01-09T22:40:37+5:302015-01-09T22:40:37+5:30
ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी ‘एसटी’ आणि प्रवाशांचे नाते जसे अतूट आहे तसेच ज्येष्ठ नागरिक आणि एसटी हे नातेही अतूटच आहे.

ज्येष्ठांना ‘एसटी’चा आधार
जयंत धुळप ल्ल अलिबाग
ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी ‘एसटी’ आणि प्रवाशांचे नाते जसे अतूट आहे तसेच ज्येष्ठ नागरिक आणि एसटी हे नातेही अतूटच आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तब्बल ५३ लाख २२ हजार ७४८ ज्येष्ठ नागरिकांनी एसटी प्रवास करुन या नात्यावर विश्वासाची मोहोर उमटवली आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या रायगड विभागीय कार्यक्षेत्रात अलिबाग, महाड, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड आणि माणगांव या आठ एसटी आगारांच्या माध्यमातून ‘आवडेल तेथे प्रवास’, त्रैमासिक पास, मासिक पास, वार्षिक सवलत कार्ड, पास, विद्यार्थी सवलत पास,अहिल्याबाई होळकर सवलत योजना, अंध प्रवासी व सहकारी सवलत पास, अपंग प्रवासी व सहकारी सवलत पास अशा बारा सवलत योजना उपलब्ध करुन दिल्या आहेत. या योजनांचा वर्षभरात जिल्ह्यात एकूण ६४ लाख ८ हजार १२१ प्रवाशांनी लाभ घेतला. त्यात सर्वाधिक म्हणजे ५३ लाख २२ हजार ७४८ ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती रायगड एस.टी.विभागाचे विभागीय नियंत्रक अजित गायकवाड यांनी दिली.
प्रवास हा ज्येष्ठ नागरिकांकरिता मोठ्या विरंगुळ््याचा भाग असतो. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठीच केवळ एसटीचा प्रवास नसतो तर या प्रवासात अनेकांशी बोलणे होते, गप्पा होतात,अनेक जुन्या आठवणींना उजाळा देणारे प्रसंग अनुभवण्यास मिळतात आणि त्यातून मिळणारा आनंद ज्येष्ठ नागरिकांकरिता मोठा असतो अशी प्रतिक्रिया अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ल.नी.नातू यांनी दिली आहे.
एस.टी.महामंडळाचे योगदान
४ज्येष्ठ नागरिकांबरोबरच जिल्ह्यातील ७ लाख ४ हजार ५८८ अपंग प्रवाशांनी तर ३१ हजार ६८४ अंध प्रवाशांनी प्रवास केला आहे. २ लाख ५५ हजार १५७ विद्यार्थ्यांनी एसटी पास सेवेचा लाभ घेतला आहे.
४ अहिल्याबाई होळकर सवलत योजनेचा ३० हजार ९६८ प्रवाशांनी लाभ घेतला. आवडेल तेथे प्रवास या योजनेचा जिल्ह्यातील २ हजार ८८४ प्रवाशांनी लाभ घेतला. वार्षिक सवलत कार्डचा लाभ ५ हजार २४ प्रवाशांनी, त्रेमासिक पासचा १० हजार ३९९ प्रवाशांनी, मासिक पासचा १८ हजार ४३९ प्रवाशांनी जिल्ह्यात वर्षभरात लाभ घेतला आहे.
गावांशी नाते जोडणारी वस्तीची एसटी
४आडबाजूच्या आणि प्रवासी सुविधा उपलब्ध नसलेल्या गावांतील लोकांना जिल्ह्याच्या वा प्रमुख शहराच्या ठिाकाणी जाण्याकरिता अशा आडबाजूच्या गावात रात्री मुक्कामास थांबणारी एसटी भल्या पहाटे त्या गावांतील मार्गातील प्रवाशांना घेवून सकाळी अकरा वाजण्याच्या आत जिल्ह्याच्या, तालुक्यांच्या वा मोठ्या शहराच्या ठिकाणी पोहोचते. अशा १२१ वस्तीच्या एसटी बसेस आजही रायगड जिल्ह्यातील १२१ गावांतून दररोज सकाळी सुटतात अशी माहिती वाहतूक नियंत्रक संजय हर्डीकर यांनी दिली.