Join us
Daily Top 2Weekly Top 5

बार आणि बेंच परस्परांशिवाय अपूर्ण; निवृत्तीदिनी न्या. गौतम पटेल झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 07:14 IST

गौतम पटेल यांनी ११ वर्षे उच्च न्यायालयाचे वकील म्हणून कामकाज पाहिले. निवृत्तीच्या दिवशी त्यांना निरोप देण्यासाठी समस्त न्यायवृंद, वकीलवर्ग, न्यायिक कर्मचारी जमले होते.

मुंबई : गेली दशकभराहून अधिक काळ आपल्या निकालपत्र लिहिण्याच्या अनोख्या शैलीने वकीलवर्गात लोकप्रिय असलेले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल गुरुवारी सेवानिवृत्त झाले. निवृत्तीच्या दिवशी सद्गदित झालेल्या न्यायमूर्ती पटेल यांनी उच्च न्यायालयाची नवी इमारत उभी राहिली तरी या न्यायालयाचे अस्तित्व टिकवावे. इथला दगड नव्या इमारतीत ठेवावा, असे सांगताना वकील आणि न्यायमूर्ती (बार आणि बेंच) परस्परांशिवाय अपूर्ण असल्याचे भावपूर्ण उद्गार काढले. 

गौतम पटेल यांनी ११ वर्षे उच्च न्यायालयाचे वकील म्हणून कामकाज पाहिले. निवृत्तीच्या दिवशी त्यांना निरोप देण्यासाठी समस्त न्यायवृंद, वकीलवर्ग, न्यायिक कर्मचारी जमले होते. निरोपाच्या भाषणात न्या. पटेल यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या चेंबरमधून दिसणाऱ्या दोन झाडांची तुलना बार आणि बेंचशी केली. ते म्हणाले की, या चेंबरमधून बाहेरची दोन झाडे मला दिसायची. या दोन्ही झाडांच्या फांद्या आणि पाने एकमेकांत गुंफलेली आहेत. त्यापैकी एका झाडाची वर्षातून अनेक वेळा पानगळ होते. तर, दुसरे झाड गवतासारखे बारमाही आहे. त्यांची मुळे एकमेकांशी इतकी गुंतलेली आहेत की, एका झाडाचे मूळ कुठे आहे दुसऱ्या झाडाचे मूळ कुठे आहे हे समजत नाही. ही दोन झाडे म्हणजे बार आणि बेंच आहेत. दोघे एकमेकांशिवाय काही करू शकत नाहीत. ते जोपर्यंत एकमेकांना आधार देत आहेत, तोपर्यंत सर्व काही नीट असेल. 

काही मित्रांनी आपण कुठे चुकलो, हे सांगण्याचे धाडस दाखविले. त्यांच्यामुळे आपण योग्य दिशेने पाऊल ठेवू शकलो, असे न्या. पटेल यांनी म्हटले. न्या. पटेल यांच्या निवृत्तीचे औचित्य साधत न्यायमूर्तींना निरोप देताना फुल कोर्ट रेफरन्स देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. न्या. पटेल यांनी याबाबत आभार मानले.  कवितेच्या चार ओळी म्हणत व अश्रूपूर्ण डोळ्यांनी त्यांनी भाषण संपविले. तर, मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्या. गौतम पटेल निवृत्तीनंतर पुन्हा प्राध्यापक बनण्याच्या विचारात असल्याचे सांगितले. तसेच, न्या. पटेल यांच्या निकालपत्र लिहिण्याच्या अनोख्या अंदाजाचेही कौतुक केले.