बॅरिकेड्स उडून तुटला पोलिसाचा हात ! अपघात करणाऱ्या दारुड्याला अटक
By गौरी टेंबकर | Updated: November 10, 2023 13:08 IST2023-11-10T13:08:31+5:302023-11-10T13:08:41+5:30
नाकाबंदी दरम्यान घडला प्रकार

बॅरिकेड्स उडून तुटला पोलिसाचा हात ! अपघात करणाऱ्या दारुड्याला अटक
गौरी टेंबकर
मुंबई: अंधेरी परिसरात भरधाव वेगाने पळणाऱ्या स्कूटरची धडक एका लोखंडी बॅरिकेडला बसली. जो उडून पोलीस कर्मचाऱ्याच्या खांद्यावर आदळल्याने त्यांचा हात मोडला तर डोक्यालाही दुखापत झाली असून याप्रकरणी दीपेश खाजेकर (२६) याला मद्यप्राशन करत, विना हेल्मेट, ट्रिपल सीट भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
जखमी कर्मचाऱ्याचे नाव श्यामचरण गावडे (५६) असे असून ते अंधेरी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात. नाकाबंदीसाठी गावडे हे रात्रीच्या ड्युटीवर असताना जेबी नगर मेट्रो स्टेशनजवळ पहाटे २.०५ च्या सुमारास ही घटना घडली. थांबण्याचे संकेत असतानाही, ट्रिपल सीट घेऊन निघालेल्या खाजेकरने पळून जाण्याच्या नादात बॅरिकेडला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये तो बॅरिकेड उडून गावडे यांच्या अंगावर जात डाव्या खांद्याला लागला. ज्यामुळे ते खाली कोसळले आणि त्यांचे डोकेही आपटले आणि गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांनी आरोपी खाजेकरला पकडले आणि गावडे यांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करवले. खाजेकरकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते आणि ब्रेथ अनालायझर चाचणीतही तो अल्कोहोल पॉझिटिव्ह आला. सहारचे पोलीस उपनिरीक्षक फ्रान्सिस रेगो यांच्यासह पोलीस पथकाने खाजेकर आणि एक दुचाकीस्वार प्रतीक यादव यांना पुढील चौकशीसाठी अंधेरी पोलीस ठाण्यात नेले. तर तिसरा साथीदार पंडित पाटील फरार झाला.