Join us  

‘बाप्पा’ जगावर आलेले कोरोनाचे विघ्न दूर कर, विसर्जनावेळी मुंबईकरांचे गाऱ्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 3:30 AM

मुंबई महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करत नागरिकांनी विसर्जन करतानाच यापुढेही कोरोनाचा बिमोड करण्याचा आपला निश्चय कायम ठेवला.

मुंबई : ना ढोल ताशा, ना डीजे, ना गोंधळ, ना कसले प्रदूषण; असा एक उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवत मुंबईकरांनी कोरोनाचे समूळ उच्चाटन करताना श्रीगणेशाला मंगळवारी साश्रुनयनांनी भावपूर्ण निरोप दिला. मुंबई महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करत नागरिकांनी विसर्जन करतानाच यापुढेही कोरोनाचा बिमोड करण्याचा आपला निश्चय कायम ठेवला. विशेषत: समुद्र अथवा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी दाखल होण्याऐवजी गणेशभक्तांनी कृत्रिम तलावांना प्राधान्य दिले.सकाळपासून सुरू झालेला हा श्रीगणेशाचा विसर्जन सोहळा मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू असतानाच आपल्या लाडक्या बाप्पाकडे ‘अवघ्या जगावर आलेले कोरोनाचे विघ्न दूर कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये...’ अशी प्रार्थनाही करण्यात आली.मुंबई शहर आणि उपनगरातील गणेशमूर्ती विसर्जनाचा आणि कोरोनासारख्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिकेची यंत्रणा गणेशाच्या विसर्जनासाठी सुसज्ज होती. पालिकेने ४४५ विसर्जन स्थळे निश्चित केली होती. यासाठी सुमारे २३ हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. अधिकारी-कर्मचारीही तैनात होते.मागील वर्षाच्या तुलनेत अधिकारी-कर्मचारी व अन्य कामगार यांची संख्या यावर्षी तिप्पट करण्यात आली होती. नागरिकांना शाडूमातीच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन हे आपल्या घरच्या किंवा सोसायटीच्या स्तरावर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आणि या आवाहनास प्रतिसाद देत मुंबईकरांकडून शारीरिक दुरीकरण पाळून आणि संबंधित सूचनांचे पालन करत गणरायाला निरोप दिला जात होता.मुंबई आणि उपनगरातील श्रीगणेश विसर्जन सोहळ्यास सकाळीच सुरुवात झाली. दुपारी यास वेग आला. विसर्जन स्थळी सुरुवातीला घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन होऊ लागले. गिरगाव चौपाटी आणि इतर छोट्यामोठ्या विसर्जन स्थळी कोणालाही पाण्यात प्रवेश दिला जात नव्हता.महापालिकेचे कर्मचारी वर्ग सर्व ठिकाणी तैनात करण्यात आले होते. जीवरक्षक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. विसर्जन स्थळी दाखल झाल्यानंतर गणेशमूर्ती महापालिकेच्या कर्मचारी वर्गाकडे सुपूर्द केली जात होती. त्यानंतर जीवरक्षक त्या मूर्तीचे विसर्जन करत होते. प्रत्येक विसर्जन स्थळी हाच कित्ता गिरविण्यात आला होता; हे यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते.पुढच्या वर्षी लवकर यागणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. कहा चली ये गोरिया, गणपती बाप्पा मोरया.एक...दोन...तीन...चार गणपतीचा जयजयकार. गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर याअसा जयघोष सर्वच विसर्जन स्थळी कानावर पडत होता. सकाळपासून सुरू झालेला हा विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.महापालिकेतर्फे विसर्जन व्यवस्थेची जी नियमावली तयार करण्यात आली होती, त्या नियमावलीला मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद देऊन आपल्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन साधेपणाने व शांततेत केले आहे. त्यामुळे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस व अनंत चतुर्दशीच्या दिवशीसुद्धा नागरिक शांततेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव आरोग्य शिबिर व विविध सार्वजनिक उपक्रम गणेशोत्सव मंडळांतर्फे राबविण्यात येऊन साजरा झाला.- महापौर किशोरी पेडणेकरमुंबईकर नागरिकांनी गणेशोत्सवामध्ये गर्दी करू नये, उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे मुंबईकर नागरिकांना करण्यात आले होते. त्या आवाहनाला मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मुंबईकरांना धन्यवाद देत आहे.- आयुक्त इक्बाल सिंह चहलपोलीस, जीवरक्षक आणि महापालिका1मुंबापुरीत विसर्जनाचा वेग दुपाओरनंतर वाढत असतानाच मुंबईतल्या प्रत्येक विसर्जन स्थळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गिरगाव चौपाटीवर सर्वाधिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. त्याखालोखाल नैसर्गिक विसर्जन स्थळी म्हणजे कुर्ला येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज तलावांसारख्या नैसर्गिक विसर्जन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता. या व्यतिरिक्त मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि जीवरक्षक मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते.नियम पाळत विसर्जन2दक्षिण आणि मध्य मुंबईतल्या बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपआपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्यावर भर दिला. लालबाग येथील मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेल्या श्रीगणेशमूर्तीचे विसर्जनही मंडळाच्या परिसरातील कृत्रिम तलावात करण्यात आले. लालबागचा राजा मंडळाने तर आरोग्य उत्सव साजरा करत सर्वांसमोरच एक चांगला आदर्श घालून दिला. चिंचपोकळी, करी रोड, परळ, वरळी, माहीम, गिरगाव, प्रभादेवी, दादर, लोअर-परळ, फोर्ट, भायखळा, डोंगरी, मुंबई सेंट्रल, ताडदेव, सायन, भांडुप, मुलुंड, विलेपार्ले, जोगेश्वरी आणि बोरीवलीसह उर्वरित सर्वच ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळांना पसंती देताना कृत्रिम तलावांनाही तेवढीच पसंती दिली जात होती आणि नियम पाळले जात होते.उत्साह, श्रद्धा आणि भक्ती3गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी उत्साह कमी नव्हता. श्रद्धा कमी नव्हती. कार्यकर्ते उत्साही होते. मिरवणुका नसल्या तरी तेवढ्याच भक्तिभावाने श्रीगणेशाला निरोप दिला जात होता. पुढच्या वर्षी लवकर ये, अशी विनंती गणपती बाप्पाला केली जात होती. एवढेच नव्हते तर आमचे काही चुकले असेल तर आम्हाला माफ कर. आणि अवघ्या जगावर आलेले कोरोनाचे विघ्न दूर कर, अशी प्रार्थनाही केली जात होती.लालबाग-परळ4मुंबईचा गणेशोत्सव म्हटले की अवघी मुंबापुरी दुमदुमते. श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जन सोहळ्यापर्यंत मुंबई भक्तिरसात न्हाहून निघते. मिरवणुका, सोहळ्यांनी मुंबईत प्राण ओतले जातात. विसर्जन सोहळ्याला तर मध्य मुंबई आणि गिरगाव चौपाटीवर पाय ठेवायला जागा नसते. यंदा मात्र कोरोनामुळे यापैकी काहीच नव्हते. मध्य मुंबईसारखे लालबाग-परळ शांत होते. गिरगाव चौपाटीवरही साधेपणाने श्रीगणेशाला निरोप दिला जात होता. उर्वरित मुंबईतही सर्वसाधारणरीत्या अत्यंत साधेपणाने श्रीगणेशाला निरोप दिला जात होता.६१ हजार गणेशमूर्तींमध्ये घटकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात सोशल डिस्टन्सिंग टाळण्यासाठी महापालिकेने कडक नियमावली तयार केली होती. त्यामुळे अनेक गणेश सार्वजनिक मंडळाने यावर्षी मूर्तीची स्थापना केली नाही.अनंत चतुर्दशीपर्यंत दरवर्षी सुमारे दोन लाख घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे गौरी विसर्जन होत असते. गेल्या वर्षी हे प्रमाण एक लाख ९६ हजार ४४३ एवढे होते. मात्र यंदा एक लाख ३५ हजार गौरीगणपतींचे विसर्जन झाले.आदर्श : यंदाच्या गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणे मोठ्या मिरवणुका निघाल्या नाहीत. ध्वनिप्रदूषण-वायुप्रदूषणही तुलनेने कमी होते. दरवर्षी अनुभवायला येणारी वाहतूक कोंडी यंदा नव्हती. समुद्र-तलाव इत्यादी ठिकाणी महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार स्वत: श्रीगणेशमूर्तीं विसर्जनासाठी न जाता गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन हे महापालिकेच्या कर्मचारी/स्वयंसेवक यांच्याद्वारे करत होते.विसर्जन : कुलाबा येथे दरिया नगर, गेट वे आॅफ इंडिया, गिरगाव चौपाटी, बाणगंगा तलाव, रजनी पटेल चौक, वरळी चौपाटी, वरळी कोळीवाडा, प्रभादेवी, माहीम रेती बंदर, बँड स्टँड, खारदांडा, जुहू चौपाटी, वेसावे किनारा, मालाड आक्सा, गोराई, तुर्भे खाडी, तुर्भे बंदर, माहुल जेट्टी, शिवडी बंदर, हाजी बंदर, भाऊचा धक्का अशा सर्वच स्थळी विसर्जन सुरू होते.धन्यवाद मुंबईकर ‘आवाज फाउंडेशन’कडून मुंबईकरांचे कौतुककोरोनाचे समूळ उच्चाटन करतानाच मुंबईकरांनी यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणालाही हरविले आहे. गणेश विसर्जन करताना कुठेही नियमांचे उल्लंघन होणार नाही; याची काळजी मुंबईकरांनी घेतली आहे. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईचा श्रीगणेशोत्सव उत्साहात, पण शांततेत साजरा झाला आहे.मुंबईकरांच्या या संयमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून, यंदाच्या गणेशोत्सवाची इतिहास नोंद होईल, असाही दावा केला जात आहे. गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाची नोंद करण्याचे काम आवाज फाउंडेशनकडून केले जाते.फाउंडेशच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुल अली यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या श्रीगणेश विसर्जनादरम्यान आवाजाची नोंद घेतली आहे.या नोंदीत वाहतूकच्या आवाजाची नोंद झाली असून, कुठेच वाद्यवृंदांचा वापर करण्यात आलेला नाही, असे फाउंडेशनने म्हटले आहे.कृत्रिम तलाव ५० टक्के गणेशमूर्तींचे विसर्जनमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी तब्बल २८ हजार घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन यावेळी करण्यात आले. गणेशोत्सव काळात एकूण एक लाख ३५ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.यापैकी ५० टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.  

टॅग्स :गणेश विसर्जनमुंबईगणेशोत्सवमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस