Join us

बाप्पा केवळ मूर्तीरूपातच आहे का? नेमका बाप्पा आहे तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:39 IST

- मनीषा मिठबावकरआजचा दिवस खास आहे, कारण आज बाप्पाचं आगमन होत आहे. आज आपण त्याची प्रतिष्ठापना करणार. त्याला गोडधोडाचा नैवेद्य दाखवणार. टाळ-मृदंग आरतीच्या तालात त्याचा जागर घालणार. पण केवळ एवढं करून बाप्पा जागा होईल? बाप्पा केवळ मूर्तीरूपातच आहे का? नेमका बाप्पा आहे तरी कुठे?बाप्पाचं मनोहारी रूप म्हणजे साक्षात मांगल्याचं प्रतीक! ‘ग’कार सिद्धीरूप, ‘ण’कार बुद्धीरूप आणि या दोघांचा ईश म्हणजे गणेश! मत्सर, मोह, अहंकार अशा वक्रगतींना तोडणारा तो वक्रतुंड! विघ्न निवारण करणारा विघ्नेश! गणांचा अधिपती गणपती! ज्याची जशी श्रद्धा त्या रूपात तो त्याला भेटतो.माणसाला रांगायला यायला लागल्यापासून त्याने आपली साथसंगत केलीय. बोबड्या बोलांना सुरुवात झाल्यापासून दोन हात डोक्यावरून धरत ‘मोरया’ म्हणणारे तान्हुले म्हणजे जीवनाचा, संस्काराचा आणि शिक्षणाचाही श्रीगणेशा! या तान्हुल्यासोबत लहान होणारा बाप्पा तरुणाईसोबत चिरतरुण होतो. उत्सवात ढोल-ताशांच्या तालावर थिरकायला लावतो. जगण्याची पे्ररणा आणि काहीतरी करून दाखवण्यासाठीची हिंमत आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा तुमच्यात ठासून भरलीय, याची जाणीव करून देतो. टाळ-मृदंग, भजन-कीर्तनातून त्याला घातलेली साद आध्यात्मिक पातळीवर आत्मिक समाधानाची उंची गाठते आणि जीवनाच्या सांजवेळी थकल्या-भागल्या जिवांमध्येही नवचैतन्याचे स्फुरण जागवते. म्हणूनच तर सर्वांचा लाडका बनून तो मनामनावर अधिराज्य गाजवतो. भाषेचं, देशाचं बंधन झुगारून परदेशातही स्वत:चं कोडकौतुक करून घेतो. नेटच्या दुनियेत विराजमान होतो. आॅनलाइन पूजा-आरतीचा आनंद घेतो आणि ग्लोबलायझेशनच्या आजच्या युगात यशाची अटकेपार झेप घ्यायची असेल तर आॅनलाइन राहा, जणू असा गुरुमंत्र देतो.बाप्पाच्या उत्सवासाठी बाजार सजतो. मूर्तिकार बाप्पाच्या मूर्तीत आपल्या कलेतून जीव फुंकतो. फुलांची मागणी वाढते. बाप्पाची सजावट, त्यासाठी केलेली रोशणाई निराशेचे मळभ दूर सारत जीवनातील सकारात्मक तेजाची जाणीव करून देते. मिठाईच्या दुकानांत मोदकांची गर्दी होते. उकडीच्या रेडीमेड मोदकांनाही ‘भाव’ येतो. हजारो हातांना काम मिळते. थोडक्यात काय तर एकाची श्रद्धा दुसºयाच्या पोटापाण्याचे साधन ठरते आणि याचे श्रेय बाप्पाला जाते.बाप्पा आणि त्याचा उत्सव म्हणजे मार्केटिंग, मॅनेजमेंटचं उत्तम उदाहरण! जात-पात, धर्म असे सर्व भेदभाव विसरून हजारो माणसांना एका मंडपाखाली एकत्र आणण्याची किमया बाप्पाच करू शकतो. नवसाच्या रूपात त्याच्या पायावर पैसे, दागदागिन्यांचा अक्षरश: खच पडतो. हेच पैसे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण तर गरिबाला उपचार मिळवून देतात. बाप्पा नावाची शक्ती आपल्या सोबत आहे, संकटातून बाप्पा आपली नक्कीच सुटका करेल, अशी आशा निर्माण झाल्याने संकटाला सामोरे जाण्याची शक्ती माणसात निर्माण होते. या श्रद्धेवरच का होईना; पण माणूस सुखी-समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.बाप्पा, आज तुझं आगमन होतंय. आमच्या समोर मात्र अनेक समस्यांचं काहूर माजलंय. तुझ्या उत्सवाचंही अनेकांनी राजकारण केलंय. सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बेमालूमपणे एकरूप झालाय. महागाईने बेजार केलंय. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येला आपलंस करतोय. अल्वयीन मुली, मुले, महिलांवरील अत्याचारांनी तर कळस गाठलाय! म्हणूनच बाप्पा तुझ्याकडे एवढंच मागणं आहे की, आमच्यातील सुसंस्कार हस्तांतरित करण्याची प्रेरणा आम्हाला दे. संयमाने संकटावर मात करण्याची शक्ती दे. स्वत:चा विचार करण्यापूर्वी दुसºयाच्या नावाचा किमान उच्चार करण्याची जाणीव आमच्यात जागृत होऊ दे. स्वार्थाची पट्टी डोळ्यांवर बांधून पैशांमागे वेगाने धावणाºया आम्हाला थोडंसं थांबून मागे वळून बघण्याची सुद्बुद्धी दे!बाप्पा... आम्हाला माहीत आहे की, तुझे मूर्तीरूप हे केवळ बाह्य प्रतीक आहे. प्रत्यक्षात माणसातील माणुसकीच्या रूपात तू आमच्या मनात वसला आहेस. म्हणूनच प्रत्येकाच्या मनातील निद्रितावस्थेतील बाप्पाला जागं करण्याचं बळ तूच आम्हाला दे! कारण एकदा का मनातील बाप्पा जागा झाला तरच उत्सवातील आणि जगण्यातील उत्साह खºया अर्थी द्विगुणित होईल. बोला गणपती बाप्पा... मोरया!!!

टॅग्स :गणेशोत्सव