Join us

बाप्पाची मूर्ती एवढी मोठी, नजर पुरेना; फांद्यांचा अडथळा, गाडी पुढे सरकेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 12:50 IST

वृक्षांची छाटणी झाली नसल्याचा समन्वय समितीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे मंगळवारी स्वातंत्र्यदिनी अनेक ठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन झाले. मात्र, मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या उंच गणेशमूर्तींच्या मार्गात विघ्न ठरत होत्या. दरम्यान, मुंबईत अनेक ठिकाणी वृक्षांची छाटणीच झालेली नाही, असा आरोप गणेशोत्सव समन्वय समितीने केला आहे.

गणेशोत्सवाला मोजके दिवस शिल्लक असून यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे अनेक मंडळांनी उंच गणेशमूर्ती घडविण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी महिनाभर आधी गणेशमूर्ती मंडळाच्या मंडपात आणण्यात येतात व त्यानंतर सजावट केली जाते. 

यंदाही अनेक मंडळांनी आगमन मिरवणुका काढून गणेशमूर्ती मंडपस्थळी आणण्यास सुरुवात केली आहे. स्वातंत्र्यदिनी मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी गणेशमूर्तींचे आगमन झाले. मात्र, आगमनाच्या वेळी काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांचा अडसर निर्माण होत असल्याची तक्रार मंडळांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडे केली आहे.

धारावीतील शास्त्रीनगर मंडळाच्या गणेशमूर्तीच्या आगमनप्रसंगी झाडाच्या फांद्या अडसर बनल्या होत्या. त्यामुळे आगमन मिरवणूक काही काळ थांबवावी लागली होती. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ नाका ते काळाचौकी नाका मार्गांवरील दुतर्फा झाडांच्या फांद्या वाढल्या असल्याची तक्रार मंडळांनी केली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

आगमन मार्गाची पाहणी करावी

- समितीच्या सदस्यांनी मुंबईतील अनेक रस्त्यांचा आढावा घेतला असून अनेक ठिकाणी खड्डे भरणे व झाडांची छाटणी योग्य पद्धतीने केली नसल्याचे आढळल्याचे समितीचे म्हणणे आहे. 

- त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींच्या आगमनाच्या मार्गाची पाहणी करावी आणि कुठे खड्डे आहेत, कुठे फांद्या छाटण्याची गरज आहे, त्याचा अहवाल तयार करून समितीला सादर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.

 

टॅग्स :गणपतीगणेशोत्सव