अंबरनाथ-बदलापूर नगराध्यक्षपदी बनसोडे, म्हात्रे

By Admin | Updated: May 18, 2015 22:49 IST2015-05-18T22:49:05+5:302015-05-18T22:49:05+5:30

कुळगाव-बदलापूर पालिकेत यंदा प्रथमच शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन करत बदलापुरात सेनेची ताकद वाढवली आहे.

Bansode, Mhatre, President of Ambernath-Badlapur city | अंबरनाथ-बदलापूर नगराध्यक्षपदी बनसोडे, म्हात्रे

अंबरनाथ-बदलापूर नगराध्यक्षपदी बनसोडे, म्हात्रे

बदलापूर : कुळगाव-बदलापूर पालिकेत यंदा प्रथमच शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन करत बदलापुरात सेनेची ताकद वाढवली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वामन म्हात्रे आणि उपनगराध्यक्षपदी श्रीधर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यावर शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात शिवसेनेची वाढती ताकद भाजपाला अडचणीची ठरणार आहे.
सोमवारी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सेनेच्यावतीने वामन म्हात्रे यांचा नगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज आला होता. तर उपनगराध्यक्षपदासाठी श्रीधर पाटील यांचा एकमेव अर्ज आला. दुपारी २ वाजता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. म्हात्रे आणि पाटील यांची नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर शिवसेनेचे स्वबळावरील सत्तेचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषद स्थापनेपासून बदलापुरात युतीची सत्ता होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत युतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. यंदा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने वामन म्हात्रे तर भाजपाच्या वतीने किसन कथोरे रिंगणात आल्याने या दोन्ही पक्षांतील मतभेद पुन्हा वाढले होते. या निवडणुकीत आमदारकी भाजपाला मिळाली असली तरी सत्तेची गणिते बदलण्याची तयारी शिवसेनेने केली होती. (प्रतिनिधी)

सोमवारी दुपारी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्रज्ञा बनसोडे यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी अमित सानप यांनी बनसोडे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेचे राजेंद्र वाळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसेने शिवसेनेला बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिल्याने आता खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस बजावणार आहे. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या निवडीनंतर पालकमंत्री स्वत: पालिकेत आले होते. निवडणुकीतील विजयापेक्षा शहराच्या विकासाला आम्ही प्राधान्य दिल्यानेच दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी लोकमतला दिली.

Web Title: Bansode, Mhatre, President of Ambernath-Badlapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.