आरक्षणाची माहिती देण्यासाठी बॅनर्स
By Admin | Updated: December 24, 2014 01:06 IST2014-12-24T01:06:28+5:302014-12-24T01:06:28+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक स्तरावर मागासलेल्या विद्यार्थ्यांना खाजगी शााळांमध्ये २५ टक्के आरक्षण देण्यात येत आहे़

आरक्षणाची माहिती देण्यासाठी बॅनर्स
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक स्तरावर मागासलेल्या विद्यार्थ्यांना खाजगी शााळांमध्ये २५ टक्के आरक्षण देण्यात येत आहे़ परंतु याबाबत पालकांना माहितीच नसल्यामुळे उपलब्ध जागेच्या निव्वळ दहा टक्केच प्रवेश देण्यात आले आहेत़ त्यामुळे अशा आरक्षणाची माहिती गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी झोपडपट्टी व शाळांमध्ये बॅनर्स लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़
गरीब विद्यार्थ्यांनाही खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेता यावा, यासाठी गेल्यावर्षीपासून असे आरक्षण लागू करण्यात आले़ त्यानुसार नऊ हजार जागा खुल्या करण्यात आल्या होत्या़ परंतु पालकांपर्यंत ही माहिती पोहोचलीच नसल्याने जेमतेम एक हजार जागा भरल्या़ त्यामुळे बॅनर्स लावून पालकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याची सूचना शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत आज केली़ मात्र राज्याच्या शिक्षण विभागाने अद्याप प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही़ हे वेळापत्रक जाहीर होताच असे बॅनर्स लावणे शक्य होईल, असे उपायुक्त सुनील धामणे यांनी स्पष्ट केले़ मात्र सदस्यांच्या आग्रहानुसार त्यांनी या आरक्षणाची माहिती देणारे बॅनर्स लावण्याची तयारी दाखविली़ आरक्षण असलेल्या शाळांच्या बाहेर व झोपडपट्ट्यांमध्ये असे बॅनर्स लावण्यात यावेत, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी दिले़ (प्रतिनिधी)