शहरात बॅनरबाजी पुन्हा बहरली
By Admin | Updated: December 3, 2014 23:16 IST2014-12-03T23:15:50+5:302014-12-03T23:16:07+5:30
राज्यातील स्थानिक प्रशासानाच्या हद्दीत बेकायदेशीर बॅनरबाजीवर मुंबई उच्च न्यायालयाने जोराचा दणका दिल्यानंतरही मीरा-भार्इंदर शहरात बॅनरबाजी आजही शहरात बहरत असल्याचे पहावयास मिळत आहे.

शहरात बॅनरबाजी पुन्हा बहरली
भार्इंदर : राज्यातील स्थानिक प्रशासानाच्या हद्दीत बेकायदेशीर बॅनरबाजीवर मुंबई उच्च न्यायालयाने जोराचा दणका दिल्यानंतरही मीरा-भार्इंदर शहरात बॅनरबाजी आजही शहरात बहरत असल्याचे पहावयास मिळत आहे.
वेगवेगळ्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने बेकायदेशीर जाहिरातबाजीला वेसण घालून प्रसंगी त्यावरील नावांसह झळकणाऱ्या छबीतील व्यक्तींवर स्थानिक पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावर पालिकेने अलिकडेच केलेल्या कारवाईत काही अराजकीय व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन कारवाईचा बडेजाव केला. परंतु, राजकीय पदाधिकाऱ्यांवरील कारवाईसाठी मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवले जात आहे.
यात आघाडीवर असलेल्या तत्कालिन युतीतील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोशात असून स्थानिक पातळीवर बहुमतात आलेल्या भाजपाने पालिकेच्या नाकावर टिच्चून शहरभर बॅनरबाजी सुरु केली आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणांसह सिग्नल, फुटपाथ, वीजेचे खांब, झाडांवर बिनदिक्कतपणे बॅनरबाजी होत असल्याने शहर विद्रुपतेने पुन्हा बहरु लागले आहे. यात पालिकेचा महसूल बुडत असला तरी राजकीय दबावामुळे कारवाईलाच वेसण घातले जात आहे. काही महाभाग तर ठराविक बॅनर्सची परवानगी घेऊन शहरात असंख्य बॅनरबाजी करीत आहेत. (प्रतिनिधी)