सहकारातील अपप्रवृतींनी बँकिंग क्षेत्र बदनाम !
By Admin | Updated: November 30, 2014 22:54 IST2014-11-30T22:54:59+5:302014-11-30T22:54:59+5:30
सहकार क्षेत्राला सध्या बदनामीचे ग्रहण लागले आहे. गेल्या काही वर्षात या क्षेत्रात काही अपप्रवृत्ती बळावल्यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्र डबघाईला आले आहे.

सहकारातील अपप्रवृतींनी बँकिंग क्षेत्र बदनाम !
वसई : सहकार क्षेत्राला सध्या बदनामीचे ग्रहण लागले आहे. गेल्या काही वर्षात या क्षेत्रात काही अपप्रवृत्ती बळावल्यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्र डबघाईला आले आहे. गेल्या काही वर्षात ४०० ते ५०० सहकारी बँका बुडल्या तर अनेक बँका डबघाईला आल्या आहेत. चांगल्या बँका मोठ्या होत नाहीत तर आजारी बँका सुधारत नाहीत, अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे. असा खंत बँक कॅबचे अध्यक्ष डॉ. मुकंद अभ्यंकर यांनी वसई विकास सहकारी बँकेच्या मुख्यालयाच्या नव्या वस्तूच्या उद्घाटक प्रसंगी व्यक्त केली.
वसई विकास सहकारी बँकेच्या मुख्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन वसईचे आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष पदावरुन भाषण करताना डॉ. अभ्यंकर पुढे म्हणाले व्यवहार व समंजसपणा अशा तीन माध्यमातून बँकाचे काम होणे गरजेचे आहे. व्यवहारात सगे-सोयरे व ओळख यास महत्व देता कामा नये. बँकेचे प्रशासनाने व्यवहारीक दृष्टीकोनातून कामकाज चालवले तर बँक चांगली प्रगती करु शकते, असा माझा अनुभव आहे. शाखा वाढणे ही बाब बँक सुस्थितीत असाल्याचे लक्षण असते. वसई विकास सहकारी अवघ्या तीस वर्षात ११ शाखाचे लक्ष्य गाठले हे कौतुकास्पद आहे. त्यानंतर आ. हितेंद्र ठाकूर यांनी वसई विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम आपल्या बँकेने केले. पूर्वीच्या संस्थापकांनी जी मेहनत घेतली त्याचे हे फळ आहे. जव्हार, मोखाडा, वाडा तसेच कल्याण, डोंबिवली, भिवंडी या भागाचाही विचार करावा. पालघरचे खा. चिंतामण वनगा यांनी बँकेने आदिवासी भागात शाखा विस्तार करावा. या बँकेच्या प्रगतीची वाटचालीचा मी साक्षीदार आहे.
याप्रसंगी खा. आनंदराव अडसूळ, बँकेचे अध्यक्ष जगदिश राऊत इत्यादीची भाषणे झाली. व्यासपीठावर जि.प.चे माजी अध्यक्ष बबन शेठ नाईक, बँकेचे माजी अध्यक्ष हेमंत म्हात्रे, माजी आ. डॉमनिक घोन्साल्वीस वसई जनता सह. बँकेचे अध्यक्ष संदेश जाधव, प्रभाग ई समितीचे सभापती नितीन राऊत, आ. विलास तरे, माजी खा. बळीराम जाधव, बँकेचे उपाध्यक्ष प्रभाकर वर्तक व केसरी टुर्सचे संचालक केसरीनाथ पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.