मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने खळबळ उडाली असताना, दादर शाखेतील हितेश मेहता या व्यवस्थापकाने बँकेतील १२२ कोटींवर डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. हितेशला पोलिसांनी अटक केली आहे.
बँकेचे काळजीवाहू मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ३१६(५), ६१(२) अन्वये हितेश मेहता व अन्य आरोपींविरोधात शनिवारी गुन्हा नोंदवला. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले. बँकेच्या आर्थिक स्थितीची पडताळणी करीत असताना आरबीआयला हितेशने अपहार केल्याचे आढळले.
संगनमताने तिजोरी साफ
हितेश मेहता याने अन्य आरोपींशी संगनमत केले. लेखाप्रमुख या नात्याने त्याच्या ताब्यात प्रभादेवी आणि गोरेगाव कार्यालयातील तिजोरी होती. त्यातील रकमेवर त्याने हात साफ केला. तो आणि त्याचे साथीदार अनेक वर्षांपासून अशा प्रकारे पैशांवर डल्ला मारत होते, असा संशय आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हितेशच्या दहिसर येथील घरी छापा मारला. झाडाझडतीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचा दावा करण्यात आला.
वाटेतच व्हायची हेराफेरी
बँकेच्या एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पैसे नेताना पैशांची हेराफेरी होत असल्याचा संशय आहे. हितेशने पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतविल्याचा संशय आहे. सर्व पैसे परत करणार असल्याचे मेहताने सांगितल्याचे समजते. दरम्यान, बँकेच्या व्यवहारांत अनियमितता आढळल्याने बँकेच्या व्यवहारांवर
१३ फेब्रुवारीपासून निर्बंध लादण्यात आले. रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया बँकेवर प्रशासक नेमत सल्लागार समिती नियुक्त केली आहे.