Join us

‘बँक आॅफ महाराष्ट्र'च्या ५१ शाखांचे विलीनीकरण, वाचा हे आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 06:16 IST

राज्यात ३५ शाखा; ३ विभागीय कार्यालयेही

मुंबई : राज्यात सर्वाधिक शाखा असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रने देशभरातील ५१ शाखांचे विलीनीकरण केले आहे. त्यात महाराष्ट्रातील ३५ शाखांचा समावेश आहे. खर्च कपातीसाठी तीन विभागीय कार्यालयेसुद्धा विलीन केली आहेत. ९,६०० कोटींच्या बुडीत कर्जांमुळे बँक १२०० कोटींचा तोटा सहन करीत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी बँकेने खर्च कपात सुरू केली आहे. त्यातूनच शाखा विलीन केल्या आहेत. त्यात ठाण्यातील सर्वाधिक ७ शाखा, मुंबईतील ६ व पुण्यातील ५ शाखा आहेत. जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, रायपूर, चेन्नई, गोवा, रायपूर, नॉयडा, कोलकाता, चंदीगड येथील शाखांचाही विलीनीकरणात समावेश आहे. बँकेच्या देशभरात १९०० व राज्यात ४५० शाखा आहेत.

बँकेतील अधिकाऱ्यांनुसार, ही प्रक्रिया चार महिने आधीच सुरू झाली होती. पण बँकेत खाती असलेले पेन्शनर्स संभ्रमात होते. हा गोंधळ दूर करण्यासाठी बँकेने विलीनीकरण नोटीस पुन्हा काढली. विलीन केलेल्या सर्व शाखा शहरी भागात आहेत. शहरातील जागेच्या भाडेदरात सातत्याने वाढ होत आहे; परंतु तुलनेत व्यवसाय वाढत नसल्याने शाखा तोट्यात होत्या. त्यामुळेच खर्चात कपातीसाठी बँकेने हा निर्णय घेतला. बँकेने तीन विभागीय कार्यालयांचेसुद्धा विलीनीकरण केले आहे. मुंबई उपनगर विभागीय कार्यालय मुंबई शहरात, रायगड विभागीय कार्यालय ठाण्यात व पुणे पश्चिम विभागीय कार्यालय पुणे शहरात विलीन केले आहे. या प्रक्रियेमुळे १२०० अधिकारी व कर्मचारी मोकळे झाले आहेत. त्यांना इतरत्र हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :बँक ऑफ महाराष्ट्रमुंबई