बँक ग्राहकांना लुटणा-या टोळीला अटक
By Admin | Updated: February 23, 2015 01:03 IST2015-02-23T01:03:24+5:302015-02-23T01:03:24+5:30
बँकेच्या ग्राहकांना लुटणाऱ्या एका सराईत टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. या टोळीवर संपूर्ण मुंबईत ५०पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बँक ग्राहकांना लुटणा-या टोळीला अटक
मुंबई : बँकेच्या ग्राहकांना लुटणाऱ्या एका सराईत टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. या टोळीवर संपूर्ण मुंबईत ५०पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बँकेतून रक्कम काढून बाहेर येणाऱ्या ग्राहकांना लुटल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात घडत होत्या. याबाबत अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या गुन्हेगारांचा पोलिसांना काहीच पत्ता लागत नव्हता. अशाच प्रकारे चेंबूर परिसरातदेखील एका इसमाला लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. त्यानुसार या घटनेचा तपास गुन्हे शाखा युनिट ६चे अधिकारी करीत होते. दरम्यान, या टोळीतील मुख्य आरोपी आणि त्याचे साथीदार चेंबूरच्या गांधी मैदान परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी परिसरात सापळा रचून इफ्तेहार शेख, जोहर खान, अश्रफ रिझवी आणि राजदेव यादव या चार जणांना अटक केली.
एखादा ग्राहक बँकेतून पैसे काढत असल्यास यातील एक आरोपी त्यावर नजर ठेवत असे. त्यानंतर तो ग्राहक बँकेतून बाहेर पडत असल्याची माहिती आरोपी बाहेर असलेल्या त्याच्या साथीदाराला मोबाइलवरून देत ग्राहकाचा पाठलाग करायचा. काही अंतर पुढे गेल्यानंतर भरधाव वेगात दुचाकीवरून जाऊन आरोपी ग्राहकांच्या हातातील पैशांची बॅग घेऊन पळ काढत होते. अशा प्रकारे या आरोपींनी वांद्रे, अंधेरी, पवई, वर्सोवा, ओशिवरा, विक्रोळी अशा परिसरात अनेक जणांना लुटल्याची कबुली दिली आहे. तसेच काही गुन्ह्यांमध्ये त्यांना यापूर्वी अटक झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)