मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पूर्वी मोबाइल चोरीनंतर त्यातील सिमकार्डची व्हिलेवाट लावून तो राज्याबाहेर विक्रीसाठी पाठवले जायचे. मात्र, गेल्या काही दिवसांत चोरांचा हा पॅटर्न बदलत असल्याचे दाखल गुन्ह्यातून समोर येत आहे. मोबाइल चोरीबरोबरच त्यातील सिमकार्डच्या मदतीने बँक खातेही रिकामे करण्याच्या घटना डोकेवर काढत आहे.
कांदिवलीतील रहिवासी असलेले सुरा गुरुराज (२९) हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यांनी गेल्या महिन्यातच नवीन मोबाइल खरेदी केला. मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता कार्यालयातून सुटल्यावर पोईसर येथे जाण्यासाठी गुंदवली मेट्रो स्टेशन गाठले. मेट्रोमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाइल लंपास केला. मेट्रोत बसल्यानंतर मोबाइल गहाळ झाल्याचे समजताच त्यांनी शोध सुरू केला. अन्य प्रवाशांच्या क्रमांकावरून कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही बंद लागला. अखेर मोबाइल चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या दिवशी कार्यालयात काम असल्याने पोलिसांत तक्रार देण्यास वेळ मिळाला नाही. रात्री उशिराने दुसऱ्या मोबाइलमधून पेटीएमचे ॲप तपासताच त्यातून ॲमेझॉन गिफ्ट कार्डचे व्हाऊचर खरेदी केल्याचे दिसून आले.
अखेर पुढील धोका लक्षात घेत त्यांनी रात्री उशिराने दिंडोशी पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार, पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. यापूर्वीच्या घटनेत शिवडीत राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गहाळ मोबाइलद्वारे दोन्ही बँक खात्यातील पावणे सात लाखांवर चोरट्याने डल्ला मारला. याप्रकरणी आर. ए. के. मार्ग पोलिस तांत्रिक माहिती आणि व्यवहारांच्या आधारे शोध घेत आहे.
यूपीआयच्या मदतीने बॅंक खाते केले रिकामे
मोबाइलमधील यूपीआयच्या आयडीच्या आधारे हे पैसे काढण्यात येत असल्याचे समोर आले. तसेच बँकेशी संलग्न असलेल्या मोबाइलच्या आधारे बँक खाते रिकामे करण्यावर भर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मोबाइल गहाळ झाला म्हणून शांत बसणे तुम्हालाही महागात पडू शकते. त्यामुळे वेळीच संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तक्रारींकडे दुर्लक्ष अन् भामट्याने दुसरेही खाते केले साफ
शिवडीतील प्रकरणात १ मे रोजी मोबाइल गहाळ झाल्यानंतर एक ज्येष्ठ नागरिक आपल्या मामीच्या अंत्यविधीसाठी अलिबागला रवाना झाले. ७ मे रोजी पैशांची गरज असल्याने त्यांनी बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा खात्यात अवघे २७६ रुपये शिल्लक असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.
बँक अधिकाऱ्याने खाते तपासताच १ ते ३ मे दरम्यान त्यांच्या यूपीआयद्वारे खात्यावर व्यवहार झाल्याचे समोर आले. दुसऱ्या बँक खात्यातून २ ते ७ मे दरम्यान टप्प्याटप्प्याने ४ लाख ९३ हजार ५०८ रुपये यूपीआयमार्फत काढण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पुढील व्यवहार थांबवले. यामध्ये दोन बँक खात्यातून एकूण ६ लाख ४२ हजार ८४६ रुपयांचे व्यवहार झाले. या व्यवहारानंतर जागे झालेल्या आजोबांनी पोलिसांत तक्रार दिली.