बंजारा शिल्पातून स्त्रीभ्रूण हत्येविरोधात लढा!

By Admin | Updated: May 7, 2014 01:16 IST2014-05-06T18:24:07+5:302014-05-07T01:16:54+5:30

राज्यातील वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येविरोधात समाजातील विविध पातळीवर जनजागृती सुरु आहे.

Banjara Shilpa fight against female feticide! | बंजारा शिल्पातून स्त्रीभ्रूण हत्येविरोधात लढा!

बंजारा शिल्पातून स्त्रीभ्रूण हत्येविरोधात लढा!

मुंबई : राज्यातील वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येविरोधात समाजातील विविध पातळीवर जनजागृती सुरु आहे. याच विरोधात आता बंजारा समाजानेही आवाज उठविण्याचे ठरवले आहे, त्याकरिता बंजारा हस्तशिल्पातून स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकंदर देशपातळीवरचे चित्र पाहता, बिहार, जम्मू काश्मीर, दादर-नगर हवेली नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लिंग गुणोत्तराच्या तक्त्यामध्ये लागत असला तरी मराठवाड्यातील बीड मध्ये सर्वांत अधिक स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच नांदेड येथील मुक्ताबाई रामदास पवार यांनी पुढाकार घेऊन बंजारा हस्तशिल्पातून जनजागृती करण्याचा निश्चय घेतला आहे.
मुक्ताबाई यांनी देशात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचे चित्रण सुबक पद्धतीने ३.५ बाय २ फूट पांढर्‍या कापडावर केले आहे. या कलाकृतीत मध्यभागी भारताचा तिरंगा असून एका बालिकेला भारतमाता उद्देशिले आहे. तसेच, इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील, किरण बेदी, अरुणा असफअली, पी.टी.उषा, लता मंगेशकर, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, कमलादेवी चटोपाध्याय, कर्नाम मल्लेश्वरी, फातेमा बीबी, अमृता कौर, मीरा कुमार, झाशीची राणी, मदर तेरेसा यांचे चित्र रेखाटले आहे. त्यांचे चित्रण करण्यासाठी मुक्ताबाई यांनी रेलो, माकी, रवव्या, मंडाव, पेटी, खडपा, कलेणी, खापली, क˜ा, काचे, पावली, फुंदा, कोडीर सडके, खिल्लन, वेली, मंडाव, पेटी, फुल कतरण, माकी, जाळीरो टाका, गाडरेर, इत्यादी टाके वापरले आहेत. ही संपूर्ण कलाकृती पूर्ण करण्यासाठी मुक्ताबाई यांना आठ महिने एवढा कालावधी लागला. यात स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी शासन काही करणार नाही, आपणच मतपरिवर्तन केले पाहिजे, असा संदेशही त्यांनी दिला आहे.
याविषयी, मुक्ताबाईंना विचारले असता समाजात जो पर्यंत वैचारिक बदल घडत नाही, तोवर समाजातील समस्यांचे उच्चाटन होणार नाही. त्यामुळे बंजारा समाजाच्या वतीने अशा अनेक कलाकृतींद्वारे राज्यभरात जनजागृती करण्यात येणार आहे. जेणेकरुन आपल्या कतृर्त्त्वाने देशाचे नाव उंचावणार्‍या स्त्रियांचा आदर्श समाज पुढच्या पिढीसमोर ठेवेल. (प्रतिनिधी)
 

Web Title: Banjara Shilpa fight against female feticide!