मुंबई : मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातच बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत बांगलादेशी नागरिकांवर कारवाई वाढत आहे. बांगलादेशातील गरिबी आणि उपासमारीला कंटाळून बांगलादेशी घुसखोर अवैध मार्गाने सीमा रेषा ओलांडून भारतात येत असल्याचे चौकशीत समोर येत आहे. मात्र, कारवाई करून कसेबसे मायदेशी धाडल्यानंतरही अवघ्या सहा ते सात महिन्यातच पुन्हा नव्या ओळखीसह ते परतत असल्याचे पोलिस कारवाईत समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
दरी, डोंगर, जंगल पार करून बांगलादेशी मुंबईत विविध ठिकाणी वास्तव्यास आहे. बांगलादेशींचे असे परतणे मुंबई पोलिसांसाठी चिंतेचा विषय आहे, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालची सीमा सुरक्षित वाटत नाही आणि हद्दपार केलेल्या अनेक बांगलादेशींनी घुसखोरीच्या मार्गाचा आणि सीमा सुरक्षा कर्मचाऱ्यांना लाच देऊन परतण्याचा मार्ग वापरल्याचा आरोप आहे.
उदरनिर्वाहासाठी करायची घरकाम
मुलुंड पोलिसांनी घरकाम करणाऱ्या पुतुल नोजू शेख (३५) हिला ६ मार्चला अटक केली होती. ५ महिन्यांपासून उल्हासनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पुतुल हिला ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेने जून २०२५ मध्ये बांगलादेशात डिपोर्ट केले होते. पण, तेथील गरिबी, उपासमारीला कंटाळून तिने भारतात घुसखोरी करून मुंबई गाठल्याचे समोर आले. गेल्यावर्षी हद्दपार केलेल्या जुलेखा जमाल शेख (३८) हिला गेटवे ऑफ इंडिया, तर कफ परेड परिसरातून बिलकिस बेगम सिरमिया अख्तर हिला अटक करण्यात आली होती.
२०२५ मध्ये एक हजाराहून अधिक बेकायदा स्थलांतरित गेले मायदेशी
बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कडक कारवाईमुळे गेल्या काही वर्षांत केवळ एमएमआरमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात अटकेच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या कारवाईचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून, मुंबईत २०२५ या वर्षात एक हजाराहून अधिक बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्यात यश आले आहे. ही कारवाई सुरू असून, २०२६ मध्ये पकडलेल्या शेकडो जणांनाही लवकरच परत पाठवले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
'त्या' दोघी पुन्हा आल्या
१६ फेब्रुवारी - थारावी पोलिसांनी रहिमा खातून रोशन अली (४१) हिला १६ फेब्रुवारी रोजी सायन-वांद्रे लिंक रोडवरील टी जंक्शनवरून ताब्यात घेत अटक केली. ही महिला नागपाड़ा येथे देहविक्री करत असल्याचे समोर आले. नागपाडा पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन गेल्या वर्षी जुलैमध्ये बांगलादेशात डिपोर्ट केले होते. त्यानंतर, चार महिन्यांतच बांगलादेशातील बेनापूर सीमेवरून ती पश्चिम बंगाल येथे आली. तेथून हावडा रेल्वे स्थानकातून तिने रेल्वेने मुंबई गाठली.
फेब्रुवारी - राबिया नासिर मुल्ला ही मिरा-भाईंदरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करताना पकडली गेली होती आणि मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी तिला बांगलादेशात परत पाठवले होते. घरकामगार प्र म्हणून तिने मिरा-भाईंदरमध्ये २५ वर्षे वास्तव्य केले होते. ती पुन्हा जंगलातून प्रवास करून सीमा ओलांडून घुसखोरीच्या मार्गाने भारतात परत येण्यात यशस्वी झाली. जुहू पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात तिला विलेपार्ले येथे पकडले.