Join us
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे, कलानगर पूरमुक्तीसाठी शिवसेना नगरसेवकांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 01:03 IST

पावसाळापूर्व कामांना अद्याप सुरुवात न झाल्यामुळे, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होण्याची भीती विरोधी पक्ष व्यक्त करीत आहेत.

मुंबई : पावसाळापूर्व कामांना अद्याप सुरुवात न झाल्यामुळे, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होण्याची भीती विरोधी पक्ष व्यक्त करीत आहेत. यामुळे शिवसेना नगरसेवकही धास्तावले असून, ‘मातोश्री’ पूरमुक्त ठेवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेचे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्यामुळे सेना नगरसेवकांवर मोठी जबाबदारी आहे. वांद्रे येथील सरकारी वसाहत, कलानगर या भागांमध्ये पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याची मागणी सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब यांनी पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे केली आहे.प्रत्येक पावसाळ्यात वांद्रे येथे कलानगर, सरकारी वसाहत आदी भागांमध्ये पाणी तुंबते. गेल्या वर्षी पावसाळ्यात मातोश्रीच्या अंगणात पाणी भरले होते, ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय झाली होती. या वर्षी जानेवारी महिन्याचा पंधरवडा उलटूनही पावसाळापूर्व कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पावसाळ्यात पाणी भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पुरातून वांद्रे परिसर मुक्त व्हावा, यासाठी सुधार समिती अध्यक्ष यांनी आयुक्तांना पत्र लिहून विशेष लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या विभागाला वारंवार पावसाळ्यात पाणी तुंबून अडचणींना सामोरे जावे लागते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील कलानगरमध्ये राहत असल्याने, पावसाळ्यात या परिसरात पाणी तुंबू नये व पाण्याचा निचरा नीट व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी परब यांनी केली आहे.>मिठी नदीचा काही भाग येतो या परिसरातएच पूर्व परिसरात चमडावाडी नाला, गोळीबार नाला, बेहरामपाडा नाला, वाकोला नदी आणि मिठी नदीचा काही भाग येतो. रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांतील, तसेच विभागातील ४२ छोट्या नाल्यांतील पाण्याचा निचरा या नाल्यातून व नदीमार्गे समुद्रात जातो. एच पूर्व हद्दी लगत अरबी समुद्र आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या भरती, ओहोटीचा परिणाम पर्जन्य जलवाहिन्यातील पाणी वाहून जाण्यावर होतो.